नवी दिल्ली, 23 मे : अलीकडच्या काळात कौटुंबिक वादातून गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. कुटुंबातील क्षुल्लक वाद किंवा कारणांवरून हत्येसारखे गंभीर गुन्हे घडताना दिसतात. मध्य प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना उघडकीस आली आहे. एका साध्या कारणावरून पणजोबांनी आपल्या छोट्या नातवाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. हा गुन्हा दीड महिन्यांनी उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आत्तापर्यंतच्या तपासातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात दीड महिन्यांपूर्वी श्रेयांश नावाच्या एका चार वर्षांच्या निष्पाप मुलाची हत्या करण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाच्या पोलीस चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या आहेत. या लहान मुलाच्या हत्या त्याच्या पणजोबांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे. नातीच्या दुसऱ्या लग्नासाठी श्रेयांश अडसर ठरत होता. तसंच माझी नात पीएससीची तयारी करू शकत नव्हती. त्यामुळे मी श्रेयांशची हत्या केली, असं पोलीस चौकशीत आरोपीनं सांगितलं. आरोपीनं श्रेयांशचं तोंड दाबून त्याचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
इंदूरमधील क्षिप्रा पोलिसांना चार वर्षांच्या लहान मुलाच्या हत्येचं गूढ उकलण्यात दीड महिन्यांनी यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लहान मुलाची हत्या त्याच्या पणजोबांनी केली. 200 तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे.
आनंदात केलेला गोळीबार दुःखात बदलला; लग्नातच चिमुकलीचा भयानक शेवट, 5 जखमी
दरम्यान, इंदूर येथील क्षिप्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडवली येथील एका चार वर्षांच्या मुलाची हत्या झाल्याचे 7 एप्रिल 2023 रोजी समोर आलं होतं. यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर पोलिसांनी दीड महिन्यांपर्यंत सतत 200 तासांहून जास्त काळ कुटुंबीयांची चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होऊ शकला. या लहान मुलाचा खून करणारा दुसरा कोणी नसून त्याचे पणजोबा असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी खुनी शोभारामकडे चौकशी केली असता, मुलाची आई नीतू चौधरी हिच्या दुसऱ्या लग्नात मूल अडसर ठरत असल्याचं त्याने सांगितलं. या मुलामुळे तिला ना अभ्यास करता येत होता ना तिचं लग्न होत होतं. या कारणामुळे पणजोबांनी त्याची हत्या केली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाबाबत इंदूर ग्रामीणच्या एसपी हितिका वासल यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं, ``24 वर्षांच्या नीतूचा विवाह देवासमधील सुतारखेडी येथील सुमित चौधरीशी झाला होता. श्रेयांशच्या जन्मानंतर सुमारे अडीच वर्षांनी सुमित आणि नीतू विभक्त झाले. तेव्हापासून ती तिच्या माहेरी राहत होती आणि पीएससीच्या तयारीत व्यस्त होती. नीतूचे आजोबा म्हणजेच श्रेयांशचे पणजोबा शोभाराम यांना वाटलं की नीतू श्रेयांशमुळे नीट अभ्यास करू शकत नाही. तसंच त्याच्यामुळे नीतूचं दुसरं लग्नही होत नाही. नीतू जेव्हा क्लासला जायची तेव्हा श्रेयांशला सांभाळण्याची जबाबदारी शोभारामवर होती. श्रेयांश मोठा झाल्यावर प्रॉपर्टीत हिस्सा मागेल, असंदेखील शोभारामला वाटत होतं. त्यामुळे आरोपीने रात्रीच्यावेळी चादरीची उशी तयार करून श्रेयांशचं तोंड दाबलं. यामुळे गुदमरून लहानग्या श्रेयांशचा मृत्यू झाला.`` पोलीस आता याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh