मोहन जाधव, प्रतिनिधी
महाड, 25 नोव्हेंबर : गावात पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला होता, त्यामुळे त्याला ठार मारण्यासाठी बंदुकीतून गोळी झाडली पण नेम चुकल्यामुळे स्वत: च्या नातवाला लागली, अशी धक्कादायक घटना रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाडमध्ये (Mahad) घडली आहे. या घटनेत नातू गंभीर जखमी झाला आहे.
महाड तालुक्यातील कोकरे येथे ही घटना घडली. काही दिवसांपासून गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक जणांना चावा घेतला होता. त्यामुळे या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी सेवानिवृत्त सैनिक असलेले यशवंत साळवी (वय 75,रा. कोकरे ) हे पुढे आले. त्यांच्याकडे एक नळी प्रकारातील बंदूक आहे. कोकरे यांनी बंदुकीने गावातील पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
प्रताप सरनाईक झाले क्वारंटाइन, ईडीकडे मागितला आठवड्याभराचा वेळ
मात्र त्यांचा नेम चुकला आणि बंदुकीतून झाडलेली गोळी जवळच उभ्या असलेल्या त्यांचा नातू कविराज अनंत साळवी (वय 31) याच्या कमरेला लागली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने महाडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
'गावात असलेल्या या कुत्र्याने प्रचंड उच्छाद मांडला होता. येणाऱ्या जाण्याऱ्या लोकांवर तो धावून येत होता. त्याला आम्ही आधीही मारण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यात यश आले नाही. मी कामावरून घरी येत होतो. तेव्हा आजोबांनी बंदुकीतून गोळी झाडली होती, मी समोरच्या बाजूने होतो, कुत्रा निसटून गेला आणि गोळी मला लागली, यात आजोबांचा काहीही दोष नाही', अशी प्रतिक्रिया कविराज साळवीने दिली.
'आता तुम्ही चौकशीला घाबरलं पाहिजे', राऊतांनी दिले भाजप नेत्याच्या चौकशीचे संकेत
दरम्यान, या प्रकरणी गावचे पोलीस पाटील भीमराव धोत्रे यांनी यांच्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस ठाण्यात यशवंत साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.