हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 04 ऑक्टोबर :चंद्रपूर जिल्ह्यात बारा वर्षांच्या मुलीवर नात्यातील चुलत काकाने अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील येनबोथला गावातील ही घटना असून 26 वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास हा संतापजनक प्रकार समोर आला. गोंडपिंपरी तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला येथे पीडित मुलीच्या आजोबाचे निधन झाले होते. त्यामुळे दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी पाहुण्यांसह जेवण करायला बसले.
पाहुण्यांना जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर पडली. यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी काका कमलाकर राऊत याने तिला घराजवळच असलेल्या रांजीत नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळातच मुलीचे वडील हे घराबाहेर निघाले असताना मुलीचा ओरडण्याचा आवाज आला.
आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपी कमलाकर राऊत याने पळ काढला. मुलीला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने दिली.
एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत याने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. 'ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारीन, अशी धमकी सुद्धा दिली होती. त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना ही बाब सांगितली नाही.
मुलीवर झालेला अत्याचार पाहून पालकांनी लगेच रात्री गोंडपिपरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने येनबोथला गाव गाठले आणि गावालगत पाण्याच्या टाकीजवळ लपून असलेल्या कमलाकरला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.
पीडित मुलीला उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील प्रमुख माणसाच्या मृत्यूनंतर त्याच रात्री बारा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या काकाच्या कृत्याबाबत तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या नराधमावर तातडीने कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.