कारमध्ये घुसून बाहेर काढलं आणि चाकू-कुऱ्हाडीने बाल्याला संपवलं, नागपूरचा VIDEO व्हायरल

बाल्या बिनेकरवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी पाहायला मिळाली.

बाल्या बिनेकरवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी पाहायला मिळाली.

  • Share this:
नागपूर, 28 सप्टेंबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरनगरीमध्ये गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. शहरातील भोळे पेट्रोल पंपाजवळ कुख्यात गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 26 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. नागपूर शहरातला भोळे पेट्रोल पंप हा वर्दळीचं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. शहरातल्या मध्य वस्तीत असलेल्या या पेट्रोल पंपावर कायम वर्दळ असते. याच ठिकाणी हा थरार घडला. दुपारच्या सुमारास 5 हल्लेखोर पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसले होते. पेट्रोल भरून बाल्या सिग्नलवर उभा होता. त्याचवेळी पाच ते सहा हल्लेखोर तिथे आले आणि चाकूने बाल्यावर हल्ला सुरू केला. चाकूने गाडीची काच फोडून काढली. त्यानंतर बाल्याला बाहेर काढले. बाल्याने कार पळवण्याचा प्रयत्न केला होता. पण, दोन हल्लेखोर कारच्या समोरच बुलेट उभी करून थांबले होते. मागून आलेल्या तिघांनी हल्ला सुरू केल्यावर गाडी तिथेच उभी करून दोघेही मागे धावले. त्यामुळे त्याला तिथून पळून जाता आले नाही. त्यानंतर त्याला जमिनीवर पाडून पाचही हल्लेखोरांनी चाकू आणि कुऱ्हाडीने वार करून संपवलं. त्यानंतर हल्लेखोर हे बाईकवरून पसार झाले. बिनेकर हा सराईत गुन्हेगार होता. तो शहरात एक रेस्टॉरंट चालवत होता. आपसी वादातून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. अंत्ययात्रेला तुफान गर्दी दरम्यान, बाल्या बिनेकरवर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. बाल्या गुन्हेगारी वृत्तीचा असला तरी गोरगरिबांना तो कधीही त्रास देत नव्हता. अनेकांना तो आर्थिक मदत करायचा. त्यामुळे या भागातील अनेक जण त्याचे समर्थक होते. बाल्याच्या अमानुष हत्याकांडामुळे नागपुरातील लालगंज, खैरीपुरा परिसरात तीव्र शोककळा पसरली आणि रविवारी दुपारी बाल्याची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत दोन हजारांपेक्षा जास्त लोकं सहभागी झाले होते. त्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published by:sachin Salve
First published: