मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

त्याने 13 जणांची केली हत्या, बर्गरमधून विकलं मांस, कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का

त्याने 13 जणांची केली हत्या, बर्गरमधून विकलं मांस, कारण ऐकून पोलिसांना बसला धक्का

मेथेनीनं 10 मुलींसह 13 जणांचा खून केल्याची कबुली दिली. प्रेयसीच्या विश्वासघातानंतर आपण असं केल्याचं त्याने सांगितलं.

मेथेनीनं 10 मुलींसह 13 जणांचा खून केल्याची कबुली दिली. प्रेयसीच्या विश्वासघातानंतर आपण असं केल्याचं त्याने सांगितलं.

मेथेनीनं 10 मुलींसह 13 जणांचा खून केल्याची कबुली दिली. प्रेयसीच्या विश्वासघातानंतर आपण असं केल्याचं त्याने सांगितलं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 नोव्हेंबर :  रागाच्या भरात माणसाच्या हातातून काय घडू शकते याचा नेम नाही. अमेरिकेतील माजी सैनिक जोसेफ रॉय मेथेनीच्या बाबतीत असंच घडलं. आपल्या प्रेयसीवर असलेल्या रागातून त्यानं कितीतरी व्यक्तींचे खून केले. सर्वांत धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर तो त्या व्यक्तीचं मांस बर्गरमध्ये भरून विकत होता. अखेरीस पोलिसांनी जोसेफला अटक केली. आपल्या कर्माची शिक्षा भोगत असताना 2017मध्ये त्याचा मृत्यू झाला. 1990च्या दशकामध्ये अमेरिकेत आपली दहशत पसरवणाऱ्या जोसेफ मेथेनीची गोष्ट भयानक पण रंजक आहे.

2 मार्च 1955 रोजी अमेरिकेतील बाल्टिमोर शहरात जोसेफ रॉय मेथेनीचा जन्म झाला होता. तो लहानपणापासून अभ्यासात अतिशय हुशार होता. त्याचे वडील नेहमी दारूच्या नशेत असायचे. असं म्हटलं जातं की, जोसेफ फक्त सहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आईसोबतही त्याचे संबंध फार चांगले नव्हते. पण, त्यांनं अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं नाही. 6 फूट 8 इंच उंचीच्या जोसेफची शरीरयष्टी बलदंड होती. वयाच्या 18व्या वर्षी तो अमेरिकन सैन्यात दाखल झाला. त्यानंतर त्याने आईसोबत काहीही नातं ठेवलं नाही. आपले आई आणि वडील दोघेही वारले आहेत असं तो सांगायचा. 1973 मध्ये यूएस आर्मीमध्ये रुजू झाल्यानंतर त्याची व्हिएतनाममध्ये पोस्टिंग झालं. व्हिएतनाममधील वास्तव्यादरम्यान त्याला लष्कराचा कंटाळा आला. म्हणून, काही वर्षांनी सैन्यातील नोकरी सोडून तो अमेरिकेत परत आला.

(काकाला मारलेल्या त्या आरोपीचा प्रताप; पोलिसांच्या वाहनाचा घडवून आणला अपघात, 7 गंभीर जखमी)

आयुष्याला मिळालं वळण

नोकरी सोडल्यानंतर त्याला दारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन जडलं. या दरम्यान त्याला एक मुलगी भेटली. ती मुलगी सेक्स वर्कर होती. काही दिवसांतच जोसेफ आणि ती मुलगी एकत्र राहू लागले. घरखर्च भागवण्यासाठी तो ट्रक चालवत असे. सेक्स वर्कर मुलीपासून जोसेफला एक मुलगाही झाला होता. 1993 मध्ये एके दिवशी जोसेफ ट्रक घेऊन अनेक दिवसांसाठी बाहेर गेला होता. तो घरी परतला तेव्हा त्याची प्रेयसी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाले होते. त्याने दोघांचा खूप शोध घेतला पण, काही सुगावा लागला नाही. खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला समजलं की, त्याची प्रेयसी मुलाला घेऊन दुसऱ्या कुणासोबत तरी पळून गेली आहे. पळून गेलेली प्रेयसी आपल्या मुलाला चुकीच्या लोकांच्या हवाली करेल, अशी त्याला भीती होती. म्हणून त्याने तिचा शोध सुरू ठेवला. आपल्या प्रेयसीला ओळखणाऱ्या प्रत्येक व्यक्तींकडे तो चौकशी करू लागला.

काही मिनिटांत केले तीन खून

एक वर्षानंतर, 1994 मध्ये तो एका नदीवरील पुलाच्या बाजूला दोन व्यक्तींना भेटला. या व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडला ओळखत होत्या. मात्र, त्या दोघांकडून जोसेफला गर्लफ्रेंडबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. रागाच्या भरात 150 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या जोसेफ मेथेनीनं दोघांवर हातोड्याने वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर दोघांचे मृतदेह नदीत फेकून दिले. मात्र, ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका मच्छिमारानं पाहिली. त्यामुळे जोसफनं त्याचाही खून केला आणि मृतदेह नदीत फेकून दिला.

(2 वर्षाच्या मुलीची मिठीत घेऊन हत्या, मृतदेहासह पित्याने तलावात घेतली उडी; कारण वाचून पाणावतील डोळे)

अटक आणि सुटका

दोन्ही व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना जोसेफ मेथेनी सापडला. पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, खुनात वापरलेलं हत्यार आणि मच्छिमाराचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे जोसेफवर फक्त दोन लोकांच्या खूनाचा खटला चालवला गेला. पण, त्यातही त्याच्याविरुद्ध पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे काही महिन्यांनी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचा स्वभाव आणखी रागीट झाला. याशिवाय, त्याच्या असं लक्षात आलं की, जर खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह आणि हत्यार दोन्हीही सापडलं नाही तर कायदा गुन्हेगाराला शिक्षा करू शकत नाही. परिणामी, तो सीरियल किलर बनला. त्याची प्रेयसी आणि तिच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तींना तो टारगेट करत असे. ड्रग्ज घेणाऱ्यांपासून ते सेक्स वर्करपर्यंत अनेकांना त्यांनं आपल्या निशाण्यावर ठेवलं होतं. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या प्रेयसीच्या चुकीच्या कृतीमुळे आपला मुलगा आपल्यापासून दूर गेला, असा त्याचा ठाम विश्वास होता. आपल्या मुलाचा विचार करून तो खून करण्यास प्रवृत्त होत असे.

सेक्स वर्करचा खून आणि सांगाड्यावर रेप

1995 पासून त्यानं रेड लाईट एरियातील मुलींना भेटायला सुरुवात केली. तो या मुलींना भेटत असे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा खून करत असे. एकदा त्यानं सेक्स वर्करची हत्या करून तिचा सांगाडा एका घरात ठेवला होता. रागाच्या भरात त्यानं तिच्या सांगाड्यावर अत्याचार केला होता. परिस्थिती अशी झाली होती की, अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातून लोक सतत गायब होऊ लागले होते. पण, त्यांचे मृतदेहसुद्धा सापडत नव्हते. एकेदिवशी एका सफाई कामगाराला एक टाकून दिलेली पेटी सापडली. ती पेटी उघडली असता त्यात एक सांगाडा होता. हा सांगाडा कॅथी नावाच्या मुलीचा होता. सेक्स वर्कर असलेली ही मुलगी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा खून कोणी व का केला हे पोलिसांना कळू शकलं नाही.

बर्गरमध्ये घालून विकलं मानवी मांस

काही महिन्यांनंतर अशाच एका पेटीत आणखी एका मुलीचा मृतदेह सापडला. तीदेखील एक सेक्स वर्कर होती. तिचाही मारेकरी सापडला नाही. जोसेफ ट्रक चालवायचा आणि कधीकधी रस्त्याच्या कडेला हातगाडी लावायचा. या हातगाडीवर त्यानं बर्गर आणि सँडविच विकायला सुरुवात केली होती. त्याच्याकडील पोर्क आणि बीफ मीट सँडविच व बर्गरला खूप मागणी होती. जोसेफ खून केल्यानंतर शरीरातील मांस काढून घेत असे आणि शिल्लक राहिलेला भाग खोक्यांमध्ये भरून फेकून देत असे. काढून घेतलेलं मांस तंदूरवर भाजून स्वत: खायचा आणि बर्गर व सँडविचमध्ये भरून विकायचादेखील.

एका सेक्स वर्कर मुलीमुळे झाला खुलासा

1996 मध्ये एकेदिवशी जोसेफ ट्रक घेऊन आपल्या टारगेटच्या शोधात निघाला होता. सेक्स वर्कर असलेल्या रिटा कॅम्परशी त्याची भेट झाली. त्याने तिला त्याच्या ट्रकमध्ये लिफ्ट दिली आणि वाटेत ड्रग्जही दिलं. यानंतर तो राहत असलेल्या कारखान्यात तिला घेऊन आला. रिटाला विचित्र वाटू लागल्यानं तिनं तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोसेफनं तिला अडवून तिला मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ट्रकमधील हातोड्याच्या मदतीनं रिटानं जोसेफवर हल्ला केला व तिथून पळ काढला. त्यानंतर तिनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत जोसेफ फरार झाला होता. पोलिसांनी रिटाच्या मदतीनं जोसेफचं रेखाचित्र तयार केलं आणि त्याचा शोध सुरू केला. अनेक दिवस त्याचा सुगावा लागला नाही. 15 ऑगस्ट 1996 रोजी एका फोनद्वारे पोलिसांना संशयित जोसेफ मेथेनीची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. त्याच्याकडून खून करण्यात वापरलेला हातोडाही जप्त केला.

एकूण 13 व्यक्तींचा केला खून

पोलीस चौकशीत जोसेफ मेथेनीनं 10 मुलींसह 13 जणांचा खून केल्याची कबुली दिली. प्रेयसीच्या विश्वासघातानंतर आपण असं केल्याचं त्याने सांगितलं.अटकेनंतर त्यानं स्वत: कोर्टात फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. ही मागणी मान्यही झाली होती. पण, 2000 साली फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. जवळपास 21 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर 5 ऑगस्ट 2017 रोजी जोसेफ मेथेनीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या कारणाबद्दल शंका व्यक्त केली जाते. तुरुंगात त्याला हृदयविकाराचा झटका आला असं सांगण्यात आलं होतं. मात्र, कैद्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त अनेक माध्यमांनी दिलं होतं.

First published: