मेरठ, 07 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशमधल्या मेरठ जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. शेतामध्ये काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चांगलीच अद्दल घडली आहे. तरुणीने हिंमत दाखवून स्वतःला नराधमापासून वाचवलं. स्वसंरक्षणार्थ तिनं दाताने त्या नराधमाच्या ओठाचा लचका तोडला. ओठ तुटल्यामुळे आरोपीच्या तोंडातून रक्त वाहू लागलं आणि तो वेदनेनं ओरडू लागला. तरुणीनेही आरडाओरडा केला. आवाज ऐकून घटनास्थळी गर्दी जमली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत आरोपीचं नाव मोहित सैनी असं असल्याचं समोर आलं आहे. आरोपी इंचोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या लवाद भागातला रहिवासी आहे. पीडितेनं आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
पीडितेच्या तक्रारीत नेमकं काय?
मेरठ जिल्ह्यातल्या दौराला पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या अझोंता जंगलात शनिवारी (4 फेब्रुवारी 2023) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, की '4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या शेतात काम करत होते. तेवढ्यात अचानक एक अनोळखी व्यक्ती माझ्याजवळ आली आणि त्याने मला पकडलं. यानंतर त्याने मला शेतात खाली पाडलं व माझे कपडे फाडण्यास सुरुवात केली. माझ्या ओठांचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी माझा बचाव करताना दाताने त्याचे ओठ चावले. त्यानंतर त्या तरुणाने माझं तोंड दाबलं आणि 'आवाज करू नकोस, अन्यथा मी तुला मारून टाकीन,' अशी धमकी दिली. मी जोरात आरडाओरडा केल्यावर जवळच शेतात काम करणारे लोक आले. त्यांच्या मदतीने मी आरोपीला पकडलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.'
हेही वाचा : मुंबईच्या रिक्षेत 22 लाखांची जबरी चोरी, पोलिसांनी फिल्मी स्टाईल आवळल्या मुसक्या!
या प्रकरणी पोलीस अधिकारी रोहित सिंह म्हणाले, की ‘एका तरुणानं मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. बचाव करताना मुलीने तरुणाच्या ओठाचा लचका तोडला. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय चाचणी आणि स्टेटमेंटही घेण्यात येत असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.’
दौराला पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय शर्मा यांनी सांगितलं की, 'पीडित मुलगी तिच्या शेतामध्ये काम करत होती. तेथून आरोपी तरुण पायी जात होता. तेव्हा त्याने पीडितेशी अश्लील वर्तन सुरू केलं. आरोपीने पीडितेचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितेनं दाताने आरोपीचे ओठ चावले. यामध्ये पीडितेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime