पाटना, 18 मे : बिहारमधील (Bihar News) समस्तीपुरमध्ये जनसाधारण एक्सप्रेसमधून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीने (22) छेडछाडीला त्रस्त होऊन चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलीचे दोन्ही पाय, हात आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिचे दातही तुटले आहेत. ती मुजफ्फरपूरमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत होती. ट्रेनने ती बरौनी येथे आपल्या घरी गेली होती.
रुग्णालयात दाखल झाल्यावर विद्यार्थिनीने सांगितलं की, दुपारी 3.15 वाजता बरौली जाण्यासाठी ती जनसाधारण ट्रेनमध्ये चढली होती. जिथं ती बसली होती, तिथं 6 मुलगे होते. ते घाणेरडे कमेंट करीत होते. त्यांना नकार दिला तरी ते घाणेरडा स्पर्श करीत होते. ती त्यांना खूप वैतागली होती. तिची याचा खूप त्रास होत होता. ती गेटच्या जवळ आली.
मदतीसाठी तिने घरी फोन केला. त्यावेळी ती मुलं फोन खेचू लागले आणि तिला घाणेरडा स्पर्श करू लागले. ट्रेनमध्ये खूप लोक होते. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. काय करावं तिला कळत नव्हतं. म्हणून स्वत:ची इज्जत वाचवण्यासाठी तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली.
मुलीने सांगितलं की, ती आरोपींना ओळखत नाही. मुलगी ट्रेनच्या खाली पडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. शिवाय तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. मुलगी बेगूसराय जिल्ह्यात राहणारी आहे. ती आपल्या घरी परतत होती. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आधी तिच्यावर उपचार सुरू केले. यानंतर तिच्या कुटुंबीयांना फोन करून बोलवण्यात आलं. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. आरोपींची ओळख पटताच त्यांना अटक करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news