मुंबई, 11 जानेवारी : पूर्व वैमन्यसातून एका तरुणाचे फिल्मीस्टाईलने अपहरण करून त्याची हत्या करण्याचा कट मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) उधळून लावला आहे. अवघ्या 6 तासांत पोलिसांनी मोहम्मद सादीक उर्फ मेंटल नवाब याची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी आरे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पाच जणांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेंटल नवाब हा नालासोपारा येथे राहतो. काही दिवसांपूर्वी एका वादातून त्याचा आरोपींशी वाद झाला होता. याचा राग म्हणून आरोपी ओवेश नभी उल्ला शेख (18), मोहम्मद फारूख गुलाम रसूल शेख (21), सत्यम पांडे (21), मोनिस पप्पू हसन सय्यद (20), नेहाल जाकीर खान (32) यांनी मेंटल नवाबच्या अपहरण करुन हत्येचा कट रचला होता.
गर्लफ्रेंडला घरातून पळवून नेण्यासाठी आला होता तरुण; तिच्या आईलाही सोबत नेलं
शनिवारी मेंटल नवाब हा आरे काॅलनीतील बस क्रमांक 32 च्या बस स्टाॅपवर उभा असताना आरोपी हे एका रुग्णवाहिकेने आले आणि मेंटल नवाबच्या जवळ गाडी थांबवून त्याला चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने आतमध्ये बसवले. मदतीसाठी नवाबने आरडा ओरडा केला. मात्र, आरोपींनी नवाबला मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवले आणि मदतीसाठी येणाऱ्यांवर चाकूचा धाक दाखवून नवाबचे अपहरण करुन त्याला घेवून गेले.
हा सर्व फिल्मी स्टाईल अपहरणाचा प्रकार दिवसाढवळ्या घडला होता. अगदी सिनेमात दाखवतात त्या प्रमाणे संशय येवू नये आणि कोणत्याही नाकाबंदीला किंवा टोल नाक्यावर आपली अडवणूक होवू नये याकरता आरोपींनी चतुराईने रुग्णवाहिकेचा वापर अपहरण करण्याकरता केला होता. मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी ते निघाले देखील होते. त्यांना काही ठिकाणी रुग्णवाहिका असल्यामुळे फायदा ही झाला पण शेवटी एका नाकाबंदीत पोलिसांनी अपहरणकर्त्यांची गाडी अडवली आणि नवाबची सुटका केली.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मुंबई बाहेर जाणाऱ्या सर्व मुंबई एन्ट्री पाँईंटवर नाकाबंदी लावली आणि 6 तासात पोलिसांनी नवाबची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. नवबाचे अपहरण आणि हत्येचा कट रचल्या प्रकरणी पोलिसांनी 5 अपहरणकर्त्यांवर 364, 397, 323, 120 (ब), 34 भा.द.वीसह 4, 25, भारतीय हत्यार कायदासह महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(अ)सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police