जळगाव, 26 मार्च: सध्या राज्यात वीजबिल (Electricity Bill) माफीवरून चांगलचं वातावरण पेटलं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) काळात अनेक वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलं पाठवण्यात आली होती. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यामुळे राज्यात वीजबिल माफीची मागणी जोर धरू लागली होती. अशातच महावितरणाने थकबाकी असणाऱ्या ग्राहकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. तसेच अनेकांचा वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं (Protest) केली आहेत.
शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीवरून भाजपचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavhan) यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. चाळीसगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील वीजबिल तोडणी संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी संतप्त शेतकऱ्यांसह जळगाव येथील अधिक्षक कार्यालयात तुफान राडा घातला आहे. त्यांनी थेट अधिक्षक अभियंत्याला खुर्चीला बांधलं होतं. या घटनेमुळे चाळीसगाव परिसरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही शेतकऱ्यांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी आमदार मंगेश चव्हाण हे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते. यावेळी एमआयडीसी पोलिसांनी त्यांची उचलबांगडी करत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातूनच अटक केली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील आदी नेते देखील जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी आले होते.
हे ही वाचा- वीज बिलाविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे मगरीचे अश्रू, प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
पोलीसांनी चव्हाण यांना अटक करून पोलिसांच्या वाहनातून त्यांना एमआयडीसी पोलीस स्थानकात नेलं आहे. आमदार चव्हाण यांच्या अटकेनंतर या घटनेचा भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत ही दडपशाही असल्याचा आरोप केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Crime, Electricity bill, Farmer protest, Jalgaon