रेवाडी, 18 नोव्हेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांड ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी या महिलेच्या एक्स बॉयफ्रेंडवर खुनाचा आरोप आहे. आरोपीही काही काळापर्यंत महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
हरियाणातील रेवाडी येथील धरुहेरा भागात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मनीष कुमार ((रा. जिरोली, भरतपूर, राजस्थान) काही काळापासून धारुहेरा येथील प्रिया नावाच्या महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता. मनीष आणि प्रिया 15 दिवसांपूर्वी धरुहेरा येथे राहू लागले होते. दरम्यान, मथुरेतील सुनरख गावात राहणारा मनोज कुमार शनिवारी रात्री मनीष आणि प्रियाला त्यांच्या खोलीत भेटण्यासाठी आला होता.
दरम्यान, मनोजने रात्री मनीषवर गोळी झाडली आणि दुचाकीवरून पळ काढला. गोळी लागल्याची माहिती मिळताच, मनीषच्या मामाचा मुलगा संतोष घटनास्थळी पोहोचला आणि त्याला रेवाडी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर मनीषला जयपूरला रेफर करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान मनीषचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी मनोजविरुद्ध खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी मनोजला अटक केली आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रिया याआधी मनोजसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. ज्याला सोडून ती मनीषसोबत राहू लागली. याचा राग मनोजला होता. या रागातून त्याने हे कृत्य केले. सध्या आरोपी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder, Relationship