• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • चंद्रपूरमध्ये दारूबंदीमुळे अंमली पदार्थांच्या विक्रीत होतेय वाढ; ड्रग्स तस्करी प्रकरणात एकाला अटक

चंद्रपूरमध्ये दारूबंदीमुळे अंमली पदार्थांच्या विक्रीत होतेय वाढ; ड्रग्स तस्करी प्रकरणात एकाला अटक

Drugs Case Chandrapur: गेल्या काही महिन्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

  • Share this:
हैदर शेख, चंद्रपूर, 08 मार्च: चंद्रपूर जिल्हात सध्या दारूबंदी करण्यात आली आहे. असं असलं तरी जिल्ह्यात ड्रग्सची नशा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही काळापासून चंद्रपूर जिल्ह्यात ड्रग्स तस्करांविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातला 'उडता पंजाब' बनतोय का? अशीही भीती व्यक्त केली जात आहे. एका ताज्या घटनेत पोलिसांनी ड्रग्स तस्कराला सापळा रचून अटक केली आहे. चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या जुना वरोरा नाका प्रेस क्लब चौकात या युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी नागपूरहून एका खाजगी ट्रॅव्हलने प्रवास करून चंद्रपूरला आला होता. यानंतर तो गाडीतून उतरून ड्रग्स विक्रीसाठी अड्यावर निघाला होता. पण तत्पूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचला होता. त्यामुळे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. गेल्या काही काळापासून हे पथक या आरोपीच्या मागावर होतं. पण तो पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता. युवकाची ओळख निश्चित झाल्यावर पोलीस पथकाने भर चौकात आरोपीला घेरून ताब्यात घेतलं आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 25 ग्रॅम ब्राऊन शुगर सापडलं आहे. या ब्राऊन शुगरची बाजारातील किंमत सुमारे दीड लाख रुपये एवढी आहे. हा आरोपी चंद्रपूर येथीलच रहिवाशी आहे, त्यामुळे हा ड्रग्स कुठून आणतो, याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. गेल्या 6 वर्षापासून जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. पण या काळात जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतूक आणि व्यसनात वाढ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यानच्या काळात अनेक छोट्या मोठ्या कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. यापूर्वी डिसेंबरमध्येही अशीच कारवाई करण्यात आली होती. चंद्रपूर शहरातील तरुण ड्रगच्या विळख्यात ओढला जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहे. त्यामुळे या परिसरात जनजागृतीचे विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत. गेल्या 4 वर्षात याच कार्यक्रमांतर्गत महाविद्यालये, शाळा आणि इतर सार्वजानिक ठिकाणांवर चर्चासत्र आणि शंका समाधान शिबिरांचं आयोजनं करण्यात आलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: