मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड, 24 मे : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट गावाच्या शिवारात नदी काठावर एका तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे दोघे प्रेमीयुगुल असल्याचा संशय असून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी मुगट गावाच्या शिवारात नदी काठावर तरुण आणि तरुणीचे मृतदेह आढळून आले होते. मयत विकास तुप्पेकर (वय 22) आणि ऋतुजा गजले (वय 18) अशी या जोडप्यांची ओळख पटली आहे. मयत दोन्ही युवक-युवती मुगट गावातीलच रहिवाशी होते.
मुगट येथील गोदावरी नदीच्या काठावरील काटवनात दुपारी दोन मृतदेह आढळून आले. प्रत्यक्षदर्शनी यासंबंधीची माहिती पोलिसांना देताच सायंकाळी घटनास्थळी पोलीस पोहोचले. युवकाच्या मोबाईल वरून त्याची ओळख पटली गेली. गेल्या तीन-चार दिवसांपासून दोघे जण घरातून बेपत्ता झाले होते. त्या दोघांचेही प्रेम संबंध होते. दोघांचा प्रेमसंबध घरच्यांना माहीत झाले होते. पण घरच्यांनी त्यांना विरोध केला, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
सायंकाळी पोलिसांनी नदीपात्रातून दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले. या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुगट गावातील ही अशी पहिलीच घटना असून याबद्दल सध्या गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे. या दोघांनी आत्महत्या केली की त्यांचा खून केला याचा तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.