हरियाणा, 10 ऑक्टोबर : हरियाणामधील हिसार इथं एका व्यापाऱ्याला कारमध्ये लॉक करून जाळून ठार मारण्यात आले अशी घटना घडली होती. मात्र, ही घटना बनावट निघाली. विम्याचे दोन कोटी रुपये लाटण्यासाठी बनाव केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या व्यक्तीला हरियाणा पोलिसांनी छत्तीसगडमधून अटक केली आहे.
आज तक वृत्तवााहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 7 ऑक्टोबर रोजी हिसार येथील हांसी शहरात दोन गुन्हेगारांनी एका व्यापाऱ्याला कारमध्ये जिंवत जाळले होते.
'बाबा, माझं अपहरण झालं, 10 लाख रुपये मागितले' मुलाच्या फोनमुळे घडले नाट्य, आणि..
पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण कारचा पाठलाग करत होते. तरुण आपला पाठलाग करत असल्याची कुणकुण व्यापाऱ्याला लागली. त्याने आपल्या कुटुंबाला फोन करून कुणी तरी आपला पाठलाग करत असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, तोपर्यंत दोन्ही तरुणांनी या व्यापाऱ्याला कारमध्ये पेटवून दिले होते.
या घटनेत व्यापारी राम मेहर यांचा मृत्यू झाला. या व्यापाऱ्याची बरवाला इथं डिस्पोजल ग्लासची कंपनी आहे. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा राम मेहर हे आपल्या कारने जात होते. त्यांच्याकडे 11 लाखांची रोख सुद्धा होती. त्यावेळी असा दावा करण्यात आला की, त्यांच्याकडील 11 लाख लुटले आणि कारसह त्यांना पेटवून दिले.
पोलिसांनी कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला आणि तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणातील प्रत्येक बाबीचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी एका संशयिताला छत्तीसगडमधून अटक केली होती. चौकशी केली असता या व्यक्तीने 2 कोटींचा विमा लाटण्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला होता.
राकेश रोशन यांच्यावर गोळीबार प्रकरणातील कुख्यात गँगस्टरला अखेर अटक
या व्यापाऱ्याच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की, त्यांचे अपहरण केले आणि पैसे लुटले होते. पण, घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली, तेव्हाच पोलिसांना संशय बळावला. अखेर घडलेला सगळा प्रकार समोर आला.
एसपी लोकेन्दर सिंह यांनी सांगितले की, 'आम्ही जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा मृत राम मेहर यांच्या कुटुंबाला विम्याचे दोन कोटी रुपये मिळणार होते. राम मेहर यांना व्यवसायात नुकसान झाले होते. त्यांच्यावर कर्जही थकले होते. त्यामुळे त्यांनी विमाच्या रक्कमेसाठी बनाव रचला होता.'
पोलीस आता कारमध्ये ज्या व्यक्तीला जिंवत जाळण्यात आले, त्या व्यक्तीचा शोध घेत आहे.