नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये झालेल्या काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येचं कोडं आता सुटलं आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तिघांना अटक केली आहे. या तिघांची नावं गुरविंदर पाल, सुखविंदर सिंह आणि सौरभ वर्मा अशी आहेत. या आरोपींच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर या हत्येमागचं आंतरराष्ट्रीय कनेक्शनही समोर आलं आहे. तिन्ही आरोपी फरीदकोट येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी रोजी गुरलाल सिंह नावाच्या एका काँग्रेस नेत्याची फरीदकोट याठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तत्पूर्वी त्याने शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. याच माहितीच्या आधारे सापळा टाकून बसलेल्या आरोपींनी गुरलालवर गोळ्या झाडल्या. गुरलाल सिंह यांच्या हत्येचा कट कॅनडामधील गोल्डी बरार नावाच्या एका गुन्हेगारांनं रचला होता. तो लारेंस विश्नोई या कुख्यात गुंडांच्या टोळीचा सदस्य आहे. लारेंस विश्नोई सध्या अजमेर येथील कारागृहात सजा भोगत आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले. पण त्यांचा काही सुगावा लागला नाही. त्यानंतर आरोपींचा उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या बेतात असताना, दिल्लीच्या विशेष पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत बरीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्येचे धागेदोरे ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या एका टोळीयुद्धाशी जोडले असल्याची माहितीही मिळाली आहे.
हे ही वाचा -वीस वर्षीय तरुणीवर भाजप पदाधिकाऱ्यासह चौघांनी केला सामूहिक बलात्कार
ऑक्टोबर 2020 मध्ये पंजाबमध्ये एक टोळीयुद्ध झालं होतं. यावेळी पंजाब विद्यापीठाच्या एका युवा नेत्याची हत्या करण्यात आली होती. हा युवा नेता कॅनडात हत्येचा कट रचणाऱ्या गोल्डी बरार यांचा नातेवाईक होता. त्यामुळे त्याने हत्येचा बदला घेण्यासाठी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावेळी आरोपींनी गुरलाल सिंहला तब्बल 12 गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गुरलाल सिंह याचा जागीच मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Murder news, Panjab