चित्रकूट,09 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशमधील धर्मनगरी चित्रकूटची भूमी ही भगवान श्रीरामांचं साधना स्थान म्हणून ओळखली जाते. भगवान श्रीरामांनी आपल्या वनवासाची साडे अकरा वर्षे इथं घालवली होती. त्यामुळे हे शहर धर्मनगरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मात्र येथील दरोडेखोरांनी ही ओळख बदलून टाकली, इतकं दरोड्यांचं प्रमाण वाढलं होतं. चित्रकूटच्या भूमीत एकापेक्षा एक कुख्यात दरोडेखोर जन्माला आले. यापैकी काही दरोडेखोरांनी दहशत पसरवून किंवा त्यांचा उद्देश पूर्ण केल्यानंतर एक-दोन वर्षांत सरेंडर केलं किंवा पोलिसांनी त्यांना ठार केलं. मात्र त्यापैकी एक दरोडेखोर असा होता, ज्याने तीन दशकं इथं आपले साम्राज्य प्रस्थापित केलं.
विशेष म्हणजे पोलिसांकडे त्याचा कोणताही फोटो नव्हता किंवा ओळख पटवता येईल, अशी कोणतीही आकृती नव्हती. पण, या दरोडेखोराची दहशत एवढी होती की, संध्याकाळ होताच घरांना कुलूपं लागायची आणि रस्त्यावर शांतता पसरायची. त्याचं नाव घेतानाही लोक थरथर कापायचे. त्याचं नाव होतं ददुआ. एकामागे एक मोठमोठ्या घटना घडवून आणणारा दादुआ 5.5 लाख रुपयांचं बक्षीस नावावर असलेला यूपीचा सर्वांत मोठा मोस्ट वाँटेड दरोडेखोर कसा आणि का ठरला या मागची गोष्ट जाणून घेऊयात.
हेही वाचा : चौकशी केली म्हणून होता राग, रात्रीच्या अंधारात रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यावर केले सपासप वार
या दरोडेखोराचं नाव शिवकुमार उर्फ ददुआ होतं. त्याच्या वडिलांचे नाव रामप्यारे पटेल. तो चित्रकूट जिल्ह्यातील देवकाली पोलीस स्टेशन परिसरातील रायपुरा इथला रहिवासी होता. त्याचे वडील रामप्यारे उर्फ रामसिंग पटेल हे अत्यंत साधे व व्यवसायाने शेतकरी होते. ते गावात शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्यानंतर गावातील जमीनदारांशी त्याचा जमिनीवरून वाद झाला. गावातील जमीनदारांनी त्यांना मारहाण करून गाढवावर बसवून धिंड काढली. वडिलांना झालेली मारहाण आणि गावात कुटुंबाचा अपमान या गोष्टींचा ददुआला त्रास होऊ लागला. त्यामुळे दादुआने याचा बदला घेण्याचं ठरवलं. वयाच्या 21 व्या वर्षी त्याला देवकाली या गावातील एका शिक्षकाच्या घरी चोरीच्या आरोपाखाली पहिल्यांदा तुरुंगात टाकण्यात आले. त्यानंतर पीएसीदरम्यान तो सीतापूरमधून पोलिसांच्या ताब्यातून निसटला व पळून गेला. त्यानंतर पोलीस त्याला कधीच पकडू शकले नाहीत.
पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यावर तो दरोडेखोरांच्या आश्रयात राहिला. तिथून मग त्याला डाकू बनण्याची इच्छा झाली. तो दरोडेखोर जनार्दन जमहली आणि डाकू सीताराम यांच्यासोबत राहून दरोडे टाकू लागला. सर्वात आधी त्याने माणिकपूरच्या रेल्वे विभागाच्या जेईचे अपहरण केले आणि 2 लाखांची खंडणी घेतली, तिथूनच त्याला खंडणीची सवय लागली. मग त्याने अपहरण आणि खंडणी घेण्यास सुरुवात केली. हळूहळू बांधकामापासून तेंदूची पानं तोडण्यापर्यंत त्याने कमिशन आकारण्यास सुरुवात केली. जो कमिशन द्यायचा नाही, त्यांचं काम बंद करून त्यांना मारहाण करायचा. दरोडेखोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलीस त्याच्या मागे लागले, ददुआला पकडण्यासाठी त्याची माहिती मिळवणं गरजेचं होतं, म्हणून पोलिसांनी काही लोकांना कामाला लावलं. मात्र, दादुआने आपली दहशत पसरवण्यासाठी पोलिसांच्या खबऱ्यांना जीवे मारण्यास सुरुवात केली. रायपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरवा गावात खबरी असल्याच्या संशयावरून ददुआने एकाच घरातील पाच जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
हेही वाचा : साखरपुड्यानंतर तरुणीचा लग्नाला नकार; तरुणाचं होणाऱ्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य, पोलीसही हादरले
ददुआची दहशत चित्रकूट जिल्ह्याच्या जवळपास डझनभर गावांमध्ये होती. तो पोलिसांच्या खबऱ्यांनाच टार्गेट करायचा. याच शंकेतून त्याने बहीलपुरवा पोलीस स्टेशन हद्दीतील लोफ्टा गावात चंदन यादव नावाच्या तरुणाचा शिरच्छेद केला होता. मग ते शीर लोखंडी रॉडला लटकवून पूर्ण गावात फिरवलं होतं. हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर लोक घाबरले. संध्याकाळ होताच घरांना कुलूपं लागायचं आणि रस्त्यावर शांतता पसरायची. एवढंच नाही तर दरोडेखोर ददुआने आणखी एक घटना घडवली होती. यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मऊ गुजरी गावात खबरी असल्याच्या संशयावरून बाप-लेकाला ट्रॅक्टरसह जिवंत जाळलं होतं. या घटनेनंतर ददुआचं नाव राज्यातच नव्हे, तर देशातील अनेक राज्यातील गुन्ह्यांत येऊ लागले होतं.
ददुआला मारण्यासाठी राज्य सरकारने अनेक पथकं तयार केली होती. मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. पोलिसांच्या खबऱ्यांपेक्षा ददुआचे खबरी जास्त अचूक माहिती द्यायचे, त्यामुळे पोलिसांना त्याचा पत्ताच लागायचा नाही. पोलीस विभागातही ददुआचे खबरी असल्याचं म्हटलं जायचं.
दरोडेखोर ददुआवर उत्तर प्रदेश सरकारने 5 लाखांचे बक्षीस जाहीर केलं होतं, तर मध्य प्रदेश पोलिसांनी 50 हजारांचे बक्षीस जाहीर केलं होतं. या ददुआचा फोटो किंवा चित्रही कुणाकडे नव्हतं. ददुआ 80 च्या दशकात चांभार आणि कुर्मी जातीच्या लोकांना आपल्या टोळीत ठेवत असे आणि हळूहळू यादव जातीच्या लोकांना त्याने टोळीतून काढून टाकलं. दरोडेखोर ददुआची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जो दरोडेखोर पोलिसांना सापडायचा, त्यांना तो कधीच आपल्या टोळीत ठेवायचा नाही.
असा झाला ददुआचा अंत
गया बाबा ददुआचे गुरू होते, असं म्हणतात. तर, जनार्दन जमहलीही स्वतःला त्याचे खरे गुरू म्हणतात. जनार्दन जमहली ददुआच्या मदतीने बदला घ्यायचा आणि ददुआ त्याच्या संरक्षणात राहायचा. नंतर ददुआ त्यांच्या टोळीत सामील झाला आणि राज्यातच नव्हे तर देशभरातील सर्वात मोठा दरोडेखोर बनला. त्याच्यावर 5.5 लाखांचे बक्षीस होते. ददुआची दहशत वाढल्यानंतर बसपा सरकारने त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी काही पथकं तैनात करून STF सोबत मोहीम सुरू केली होती. तेव्हा बॉम्बने हल्ला करण्यात आला आणि त्यात ददुआ त्याच्या साथीदारांसह मारला गेला, असं म्हटलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18