मुरैना, 13 डिसेंबर: मध्य प्रदेशातील मुरैना येथे "वधू आणि वर आणि मेहुणी" चं एक विचित्र प्रकरण समोरं आलं आहे. आपण क्वचितच ऐकलं असेल, की लग्न केलं नवरीसोबत आणि पळवलं नवरीच्या बहिणीला. ही घटना मध्यप्रदेशातील पद्दापुरा या गावातील आहे. येथे एका अल्पवयीन मुलीचं लग्न झालं, परंतु कायदेशीर विरोधामुळे ते अमान्य ठरवलं गेलं. लग्न आणि अपहरण या दोन्हीतून मुलींना वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. पण नवरा मुलगा अद्याप फरार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.
पोलीस व महिला व बालविकास अधिकाऱ्यानी सांगितलं की ती संबंधित मुलगी अल्पवयीन असून दलित समाजातील होती. या अल्पवयीन मुलीचं लग्न तिचे कुटुंबीय लावत होती. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस मुलीच्या घरी पोहोचले आणि वधू-वर यांच्यासह कुटुंबीयांना समजावून सांगितलं. मुलीला पोलीस ठाण्यात आणलं. पण तत्पूर्वी लग्न पार पडलं होतं.
मुलाने मुलीच्या भांगेत सिंदूरही भरला होता, परंतु पोलिसांनी हे लग्न अवैध ठरवलं. पोलिसांनी मुलालाही समजावून सांगितलं. हे पाऊल कसं बेकायदेशीर आणि चुकीचं आहे. यामुळे कुटुंबीयांना तुरूगांत जावं लागेल, असं सर्व प्रकारे पोलिसांनी नवऱ्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण मुलगा कोणाचंही ऐकूण घ्यायला तयार नव्हता.
जेव्हा मुलाचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं
जेव्हा मुलाला असं वाटलं, की आता यापुढे आपलं काही चालणार नाही, तेव्हा तो तावातावात पोलिस स्टेशनच्या बाहेर आला. दरम्यान, तो वधूच्या बहिणीकडे गेला, तिला काही कळायच्या आत त्यानं तिला उचलून पळ काढला. ही मुलगीही अल्पवयीन आहे. पोलिसांनी मुलीला कसं बसं शोधून काढलं आहे, पण नवरा मुलगा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. हे लग्न लावून देणाऱ्या वराच्या मावशीला पोलिसांनी अटक केली आहे.