रायपूर 2 जुलै: बलात्काराला विरोध करणाऱ्या एका अल्पवीयन मुलीला जिवंत जाळल्याची संतापजनक घटना छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) घडली आहे. राज्यातल्या मुंगेली जिल्ह्यातल्या (Mungeli District ) ग्रामीण भागात ही घटना घडली. पीडित मुलगी त्यावेळी घरात एकटीच होती. तिच्या मागावर असलेला युवक घरात आला आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या त्या तरुणाने रॉकेल टाकून दिला पेटवून दिलं. उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला.
बबलू भास्कर असं आरोपी तरुणाचं नाव आहे. बबलू हा पीडित मुलीच्या गावचाच रहिवासी आहे. तिच्या घरची मंडळी कामासाठी बाहेर गेली होती. त्यावेळी ती एकटीच घरात होती हीच संधी साधत बबलू हा तिच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. याला विरोध करताच त्याने रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. येतानाच तो रॉकेल घेऊन आला होता अशीही माहिती आता पुढे येत आहे.
आग लागताच मुलगी वाचवा, वाचवा असा टाहो फोडत होती. मात्र अशाही परिस्थिती त्या क्रृर तरुणाला तिची दया आली नाही. तो तिथून पसार झाला. आजुबाजूच्या लोकांना घटनेची माहिती मिळताच ते धावून आले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं. त्यावेळी ती मुलगी 90 टक्के भाजली होती. या घटनेने मुलीचं सगळं कुटुंबच उद्धवस्त झालं आहे.
हे वाचा - मुंबई हादरली, शुल्लक भांडणातून 4 वर्षांच्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या
हॉस्पिटलमध्ये जाताच पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवून घेतला. मात्र उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बबलू भास्करला अटक केली असून पोलीस आणखी तपास करत आहेत. या घटनेमुळे या परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.