सचिन जिरे, प्रतिनिधी
औरंगाबाद, 03 डिसेंबर : एकीकडे औरंगाबाद (Aurangabad) शहरात पदवीधर निवडणूक आणि कोरोनामुळे कलम 144 लागू आहे पण दुसरीकडे चक्क चरस तस्करीच्या (Charas smugglers) गुन्ह्यातील आरोपी जामिनावर सुटताच त्याच्या पंटरांनी आतषबाजी करत मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला. या मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधिताविरोधात बेगमपुरा पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.
अकबर अली असं जामिनावर सुटलेल्या आरोपीचं नाव असून त्याला दोन महिन्यांपूर्वी चरस तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर टॉऊन हॉल परिसरातून आसेफिया कॉलनीपर्यंत त्याची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. अली विरोधात पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने कारवाई केलेली आहे. तो हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
#औरंगाबाद : चरस तस्करीतील आरोपी जामिनावर सुटताच पंटरांनी फोडले फटके, धिंगाणा घालत कारवरून काढली मिरवणूक pic.twitter.com/pdG5ojCm6g
— News18Lokmat (@News18lokmat) December 3, 2020
तब्बल महिन्याभरानंतर जामिनावर सुटल्याने त्याच्या साथीदारांनी बुधवारी रात्री चारचाकी वाहनाच्या टपावर बसवून गळ्यात फुलांची माळ घालून, फटाक्यांची आतषबाजी करत भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये शेकडो तरुण सहभागी होते. ढोल ताशाच्या तालावर बेफाम डान्स करत अकबर अलीची मिरवणूक काढली.
धक्कादायक म्हणजे, कोरोनाचे नियम सर्वांनी पायदळी तुडविले. जोरदार घोषणाबाजीआणि फटाक्यांची तुफान आतषबाजी करून या टोळक्याने परिसर दणाणून सोडला होता. मिरवणुकीदरम्यान तरुणांनी गाण्याच्या तालावर बेधुंद धिंगाणा घातला. यावेळी ट्रॅफिक जाम झाली होती.
हा सर्व प्रकार बेगमपुरा पोलिसांना मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजला, तोपर्यंत आरोपी घरी पोहोचला होता. गुरुवारी या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.