Home /News /crime /

चंद्रपूरमध्ये कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या, परिसराला छावणीचं रूप

चंद्रपूरमध्ये कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या, परिसराला छावणीचं रूप

काही अज्ञात आरोपींनी कुर्‍हाडीने वार करत मनोज अधिकारी याचा खून केल्याचे निष्पन्न झालं आहे.

हैदर शेख, चंद्रपूर, 30 सप्टेंबर : चंद्रपूर शहराच्या सीमेवर असलेल्या दाताळा परिसरातील 'सिनर्जी वर्ल्ड' या सदनिका वसाहत असलेल्या परिसरात एका फ्लॅटमध्ये मनोज अधिकारी नामक युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा फ्लॅट स्वतः मनोज अधिकारी याच्या मालकीचा होता. रात्री या फ्लॅटमध्ये काहीजणांनी पार्टी केल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर काही अज्ञात आरोपींनी कुर्‍हाडीने वार करत मनोज अधिकारी याचा खून केल्याचे निष्पन्न झालं आहे. चंद्रपूर शहराच्या बंगाली कॅम्प परिसरात दोन टोळ्यांमध्ये गेली काही वर्षे संघर्ष सुरू आहे. त्या टोळ्यांच्या जुन्या वादातूनच मनोज अधिकारी याचा निर्घृण खून झाला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान दबदबा असलेल्या मनोज अधिकारी याची हत्या झाल्याचे कळताच शहरातील बंगाली कॅम्प परिसरात मोठा जमाव रस्त्यावर आला. या भागाला सध्या छावणीचे रूप आले असून वरिष्ठ पोलीस अधिकारी सिनर्जी वर्ल्ड येथील घटनास्थळी दाखल होत नेमकी हत्या कशी घडली याबाबत तपास करत आहेत. दुसरीकडे मनोज अधिकारी याच्या हत्येआधी शहरातील रयतवारी कॉलरी परिसरात दुहेरी खून प्रकरण झाले होते. त्यामुळेच लागोपाठ होणाऱ्या या हत्यांमुळे चंद्रपूर शहरात पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान, मनोज अधिकारी याच्या हत्या प्रकरणातील काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यात एका महिलेचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण हत्याप्रकरणात पोलीस मात्र कॅमेरावर बोलण्यास तयार नाहीत. शहरातील बंगाली कॅम्प भागातील तणावाची स्थिती बघता या भागात अधिक पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Chandrapur, Murder news

पुढील बातम्या