CCTV VIDEO : नागपूरमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला, आरोपींना अटक

CCTV VIDEO : नागपूरमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला, आरोपींना अटक

या घटनेप्रकरणी चार आरोपींना आता अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

नागपूर, 24 ऑक्टोबर : पोलिसांनी कारवाई केली म्हणून नागपूर ग्रामीण परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. सप्टेंबरमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी चार आरोपींना आता अटक करण्यात आली आहे.

जखमी पोलीस हवालदार रवींद्र तुळशीराम चौधरी (वय 44) राहणार भिलगाव, कामठी यांनी आपले कर्तव्य बजावत अवैध वाळू व्यवसायात सामील असलेला सराईत गुन्हेगार कमलेश हरिशचंद्र मेश्राम याचा भाऊ नितेश मेश्राम याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाही केलेली होती. त्यानंतर आरोपीच्या भावाकडून अरेरावीची भाषा करण्यात येत असल्याने ठाण्यात आणून रवी चौधरी यांनी त्याला चोप दिलेला होता.

भावावर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाही विरोधात आरोपी कमलेश संतापलेला होता. अशातच आरोपीकडून सूड घेण्याच्या हेतूने चौधरी यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणाच्या तपासादरम्यान चौधरी यांच्यावर जिथं हल्ला झाला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. त्यानंतर आरोपींवर कारवाई करत अटक करण्यात आली आहे.

नागपूर शहरात अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांविरोधात अनेक कारवाया केल्या जात आहेत. यापुढेही अवैध धंदे आणि अवैध वाळू वाहतूक चालणार नसून अवैध व्यवसाय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना ठाणेदारांना देण्यात आल्या आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या