Home /News /crime /

Nashik News: न्यायालयातून घटस्फोट का घेतला? महिलेला जात पंचायतीकडून थुंकी चाटण्याची किळसवाणी शिक्षा

Nashik News: न्यायालयातून घटस्फोट का घेतला? महिलेला जात पंचायतीकडून थुंकी चाटण्याची किळसवाणी शिक्षा

Crime in Nashik: जात पंचायत अस्तित्वात असताना न्यायालयातून घटस्फोट का घेतला? तो मान्य आम्हाला मान्य नाही, असं म्हणत जात पंचायतीच्या सदस्यांनी महिलेला अमानुष वागणूक दिली आहे.

    नाशिक, 30 एप्रिल: पुरोगामी महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेनं आपल्या पतीशी पटत नसल्यामुळे न्यायालयातून कायदेशीर घटस्फोट घेतला आहे. ही बाब जात पंचायतीच्या पचनी न पडल्यानं त्यांनी संबंधित महिलेचा छळ सुरू केला आहे. जात पंचायत अस्तित्वात असताना न्यायालयातून घटस्फोट का घेतला? तो मान्य आम्हाला मान्य नाही, असं म्हणत जात पंचायतीच्या सदस्यांनी महिलेला अमानुष वागणूक दिली आहे. जात पंचायतीच्या सदस्यांनी पीडित महिलेला थुंकी चाटण्याची (punished to lick spit) शिक्षा दिली आहे. एवढंचं नव्हे तर जात पंचायतीनं एक लाख रुपयांची मागणी देखील केली आहे. संबंधित घटना नाशिक जिल्ह्यातील नाथजोगी येथील आहे. पीडित महिलेनं 2011 साली नाथजोगी गावातील एका तरुणाशी लग्न केलं होतं. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर, पीडितेच्या पतीनं तिला दारू पिऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. नवऱ्याकडून दररोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं आपल्या पतीकडून रितसर घटस्फोट घेतला. आणि 2019 साली दुसऱ्या एक घटस्फोटीत व्यक्तीसोबत विवाह केला. असं असताना, न्यायालयीन पद्धतीनं घेतलेला घटस्फोट आम्हाला मान्य नाही, असं म्हणत जात पंचायतीनं पीडित महिलेचा आणि तिच्या परिवाराचा अमानुष छळ केला आहे. जात पंचायतीच्या सदस्यांनी केळीच्या पानावर थुंकी टाकून ती थुंकी पीडितेला चाटण्याची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडित परिवाराकडून एक लाख रुपयांचा दंडही आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पीडित परिवाराला समाजातून बहिष्कृत केलं असून त्यांना मदत करणाऱ्या इतर चार परिवारांवरही जात पंचायतीनं कारवाईचा बडगा उचलला आहे. हे ही वाचा-मुलगी अपशकुनी समज करून जन्मदात्या आई-बापानेच छळले, अखेर चिमुरडीने सोडला जीव! पीडित महिलेनं आपल्या पहिल्या पतीसोबतच राहावं, यासाठी जात पंचायतीकडून दबाब आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंचाच्या दबावामुळे पीडित महिला आपल्या माहेरी राहत आहे. तर दुसऱ्या नवऱ्यालाही जात पंचायतीनं धमकी दिली आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना अशा प्रकारची शिक्षा सुनावल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nashik

    पुढील बातम्या