कैरो, 24 मार्च: एका मित्राला घरी बोलावलं म्हणून घर मालकाने एका युवतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मृत युवती भाडेकरू म्हणून एका फ्लॅटमध्ये राहत होती. दरम्यान तिने तिच्या एका मित्राला (Male Friend) घरी आणलं होतं. यामुळे घरमालक आणि इतर शेजारील रहिवासी तिच्यावर संतापले होते. त्यानंतर रागाच्या भरात घरमालकाने पीडित महिलेच्या घरात घूसून तिला मारहाण केली, त्याचबरोबर तिला सहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली फेकलं आहे. अशी माहिती समोर येते आहे की, मृत युवतीनं तिच्या मित्राला घरी आणल्यानं आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांचा तिच्यावर रोष होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इजिप्तची राजधानी कैरो येथील आहे. यावेळी घरमालकाने संबंधित युवतीला सहाव्या मजल्यावरून फेकून तिची हत्या केली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून मृत महिलेचा घरमालक, वॉचमन आणि शेजारी लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. पण अटक झाल्यानंतर संबंधित घरमालकाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच संबंधित मृत महिला मानसिकरित्या अस्वस्थ होती. त्यामुळे तिने स्वतः सहाव्या मजल्यावरून उडी मारली, असा दावा आरोपी घरमालकानं केला आहे.
या घटनेनंतर देशभरात याचे पडसाद उमटू लागले आहेत. सोबत महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे कार्यकर्ते महिलांच्या हक्कासाठी लढत आहेत. कारण इजिप्तमध्ये महिलांच्या बाबतीत अनेक कठोर नियम बनवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अविवाहित महिलेनं एखाद्या पुरुषाला भेटणं सामाजिकदृष्ट्या लज्जास्पद मानलं जातं. अशातच संबंधित युवतीची हत्या झाल्यानं इजिप्तमध्ये महिला अधिकाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
(हे वाचा -क्रूरतेचा कळस! तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण; लघुशंका पाजण्याचा केला प्रयत्न)
अलीकडेच काही काळापूर्वी इजिप्तमध्ये काही नवीन कायदे करण्यात आले आहेत. महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी याचा विरोध केला आहे. या नवीन कायद्याच्या अनुषंगाने इजिप्तमधील महिला पुरुषांच्या परवानगीशिवाय घराच्या बाहेरही पडू शकत नाही. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, या कायद्यांमुळे इजिप्त 200 वर्षांपूर्वी मागे जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder news