बीड, 19 एप्रिल : बीडमध्ये जलसंधारण विभागाच्या (Department of Water Resources) अभियंता (engineer) आणि कंत्राटदार (contractor) यांच्यातील एका फोनचं रेकॉर्डिंग (Call Recording) चांगलंच व्हायरल झालं आहे. संबंधित रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. जलसंधारण विभागत नेमकं काय सुरुय? असा प्रश्न रेकॉर्डिंग ऐकल्यावर उपस्थित केला जातोय. कोरोना काळात स्थगित केलेल्या कामांसाठी पैशांची मागणी केली जातेय. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून आर्थिक व्यवहार झाल्याचं स्पष्टपणे समजतंय. विशेष म्हणजे दिलेले पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले तरी का काम होत नाही? असा धक्कादायक प्रश्न या संवादाच्या माध्यमातून जगासमोर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बीडच्या जलसंधारण विभागातला प्रकार आहे. जलसंधारणाची कोविडच्या आधी जी मंजूर झालेली कामे होती त्या कामाच्या संदर्भात कंत्राटदाराने पैसे दिले आहेत. तसे पैसे अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. क्लिपमध्ये नाथ नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा उल्लेख आहे. पैसे दिल्यानंतर माझं काम होत नाही, असा उल्लेख क्लिपमध्ये आहे. विशेष म्हणजे पैसे घेतल्याचंही अधिकारी मान्य करतोय. पैसे दिल्यानंतरच काम मंजूर होत आहेत, अशी चर्चा सुरु आहे.
(भोसरी जमीन घोटाळा प्रकणात एकनाथ खडसेंच्या पत्नींना मोठा दिलासा, कोर्टाने निर्णय ठेवला कायम)
जलसंधारण विभागात कोविडच्या आधीच्या कामांना स्थगिती दिली गेली होती. ती कामे नव्याने करायची असतील तर नव्याने पत्र प्राप्त करुन घ्यावे लागत आहेत. ते पत्र प्राप्त करुन घेण्यासाठी पुन्हा एकदा पैशांची मागणी केली जातेय. त्यानंतर अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील वाद समोर आला आहे, अशी चर्चा आहे. दरम्यान, अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील संभाषणाच्या क्लिपचं 'न्यूज 18 लोकमत' पुष्टी करत नाही.
कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमका काय संवाद?
कंत्राटदार : साहेब , आमच्या दिलेल्या पैशातील एक रुपयाला जरी धक्का लागला तर याला जबाबदाार तुम्ही आहेत. आम्ही तुम्हाला पैसे दिले साहेब
अभियंता : मी पैसे गोळा करणारा अभियंता नाही. नाही..तसा काही विषय नाही. मी तिकडे पोहचून देईल. असं थोडं असतं काही.. मी काय आता निवृत्त झालो म्हणजे मला डिपार्टमेंटचं काहीच माहित नाही, असं काही असतं?
कंत्राटदार : तुम्हाला सगळं माहित असेल. पण आम्ही कसं करायचं. आम्ही पैसे दिले ना.. आम्ही साहेबांना पैसे दिले नाहीत.
अभियंता : असू द्या ना ते काय ते... तुम्ही मला जरी पैसे दिले तरी माझ्याकडे ठेवण्यासाठी थोडी दिले. त्यांच्याकडे मिळाले नसले तर तो माझा विषय येतो.
कंत्राटदार : आम्ही दिलेल्या पैशात काम झालं नाही म्हणून तुम्हाला बोलायची वेळ आली.
अभियंता : नाही-नाही. तुमचा विषय साहेबांशी निगडीच आहे. ते साहेब जर म्हणाले मला इकडून आलेच नाहीत तरा विषय आहे तो. तुम्ही एकदा नाथ साहेबांना भेटा. म्हणजे त्यात काहीतरी होईल.
कंत्राटदार : नाथ साहेबांना परस्पर आम्हाला कसं भेटता येईल?
अभियंता : का भेटता येणार नाही?
कंत्राटदार : आमचा आणि त्यांचा व्यवहारच नाही.
अभियंता : असं थोडीय?
कंत्राटदार : नाही ना साहेब
अभियंता : असं थोडीय.. त्यांनी नाही म्हणावं. तुम्ही त्यांना भेटा. त्यांनी नाही म्हणावं. माझ्याकडे आलंच नाही म्हणावं. नंतरचा माझा विषय आहे.
कंत्राटदार : नाही-नाही. तुम्ही पैसे दिले की अंग काढून घेतात. त्यांच्या हातात आम्ही पैसे दिले नाहीत ना.
अभियंता : ठीक आहे. त्यांनी तसं नाही म्हणावं ना, की माझ्याकडे आले नाही. नंतर माझा विषय येईल.
कंत्राटदार : आम्ही शेवटी करायचं काय?
अभियंता : एकदा तुम्ही नाथ साहेबांना भेटा. माझीसुद्धा भेट झालेली नाही. एक-दोन दिवसात भेट घेऊन तुमच्या सर्व भावना त्यांच्या कानावर घालतो. आता त्यांच्या कानावर टाकल्यानंतर काय त्यांच्या रिअॅक्शन ते फोनवर जास्त बोलता येत नाही. करता येत नाही. ते कुठे आहेत? माहिती नाही. दोन दिवसात त्यांची भेट घेतो. त्यांना सविस्तर सांगतो. मग बघू काय म्हणतात ते....
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.