बरेली 24 मार्च : उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील (Bareilly) बिशारतगंज ठाणे क्षेत्रात अखा गावात निवडणूक लढवण्यास मनाई केल्यानं एका युवकानं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. मोठ्या भावानं त्याला जिल्हा पंचायत निवडणुकीच्या (UP Panchayat Election) रिंगणात उतरण्यास मनाई केल्यानं लहान भावानं स्वतःवरच गोळी झाडून घेत आत्महत्या (Suicide) केली. गोळी लागताच तो जमिनीवर कोसळला. आवाज ऐकून त्याचे कुटुंबीय पळत बाहेर आले आणि त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गजेंद्रला रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र कुटुंबीयांनी शवविच्छेदनास नकार दिला. मात्र, गोळीमुळे मृत्यू झाल्याचं सांगत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदन केलं. यात डोक्याला लागलेल्या मारामुळेच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. बरेलीच्या अखा गावातील रहिवासी असलेले बिजेंद्र सिंह आपल्या तीन भावांसोबत राहातात. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबातील काही लोक गावप्रमुख आहेत. यावेळीही बिजेंद्र हे गावप्रमुख होते व ते पुन्हा आगामी निवडणुकीची तयारी करीत होते. परंतु त्यांचा धाकटा भाऊ गजेंद्र यांना जिल्हा पंचायतची निवडणूक लढवायची होती. जेव्हा यूपी पंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली तेव्हा कौटुंबिक सभेत गजेंद्र यांनी जिल्हा पंचायत निवडणूक लढविण्याविषयी इच्छा व्यक्त केली मात्र त्यांच्या मोठ्या भावानं यासाठी नकार दिला.
लहान भावाच्या मृत्यूनंतर मोठ्या भावानं ही सर्वच स्वतःची चूक असल्याचं म्हटलं. आता मोठ्या भावाला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे, की त्यानं आपल्या भावाला निवडणूक लढण्यास नकार देऊन चूक केली. आता बिजेंद्रनं ठाण्यात भावाच्या आत्महत्येची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितलं, की कौटुंबीक वादामुळे युवकानं गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Person suicide, Suicide, UP