चेन्नई की राजस्थान? औरंगाबादेत बुकी बाप-लेकाला अटक, धक्कादायक माहितीसमोर

चेन्नई की राजस्थान? औरंगाबादेत बुकी बाप-लेकाला अटक, धक्कादायक माहितीसमोर

औरंगाबाद शहरातील गल्ली बोळापासून ते उच्चभ्रू वसाहतीपर्यंत हे रॅकेट सक्रीय आहे. शहरात सुमारे 100 ते 200 एजंटमार्फत सट्टा घेतला जात असल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 20 ऑक्टोबर : एका 10 बाय 10 च्या खोलीत अत्यंत गुप्त पद्धतीने आयपीएलच्या  सामन्यावर  मोबाईल फोनद्वारे सट्टा घेणाऱ्या बुकी पिता-पुत्रांच्या अड्ड्यावर पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने छापा टाकून अटक केली आहे. पोलिसांनी या घरातून मोबाईल, राउटर, डायरी असा सुमारे 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमीचंद शांतीलाल कासलीवाल (वय 56) आकाश नेमीचंद कासलीवाल (वय 25) (दोन्ही राहणार काचीवाडा) अशी अटक करण्यात आलेल्या बुकी पिता-पुत्रांची नावे आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात आयपीएल सामन्याची धूम सुरू आहे. याच सामन्यावर शहरातील पिता पुत्र मोठ्या प्रमाणात सट्टा खेळत असल्याची माहिती पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे यांना मिळाली होती.  खात्रीशीर माहितीच्या आधारे रोडे यांनी दामिनी पथक तसंच इतर विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सहकाऱ्यांचे पथक घेऊन घटनास्थळी सापळा रचला. पंटरच्या मदतीने लोकेशन ट्रेसकरून त्या ठिकाणी 10 बाय 10 च्या खोलीत छापा टाकला असता त्या ठिकाणी दोघेही आरोपी  बुकी घेताना आढळून आले.

उपमुख्यमंत्र्यांच्या फोनवरून रात्री गेला अश्लील व्हिडीओ, म्हणाले-'हॅक केला फोन'

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सट्टा लावण्यासाठी वापरण्यात येणारे विविध मोबाईल, इंटरनेटसाठी वापरला जाणाऱ्या राउटरसह 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय ग्राहकांच्या नावाची व्यवहाराची, एक डायरी  पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केली आहे. त्यावरून गेल्या चार दिवसांत सुमारे 70 ते 80 लाखाचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून दोन्ही आरोपींकडून या  रॅकेटची अजून बरीच माहिती उघड होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि शहरा बाहेरील अनेक मोठी नावं यामध्ये सामील असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

डायरीमध्ये आढळली ही नावे

देवानंद, गोट्या शिरसाठ, सचिन, ओम,अक्षय भारत, आदित्य, सिकंदर, कृष्णा,अनिल,जीवन, युनूस, हेमंत, नासेर, आकाश, आनंद, अनिस, रवी काला, साकला, योगेश अशी नावे आढळली तर पाच हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत ही मंडळी सट्टा लावत होती. त्यांच्या नावासमोर रक्कम नमूद केलेली आहे. अर्धवट नावे असल्याने हे ग्राहक शोधण्याचा पोलिसांसमोर एक आव्हान आहे.

मास्टरमाइंड दगडा फरार

काही दिवसांपूर्वीच जिन्सी पोलिसांनी छापा टाकत एक आयपीएल सामन्यावर सट्टा घेणारा एजंट पकडला होता. तपासात दगडा नावाचा व्यक्ती हा या रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याचे समोर येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दगडा पसार झाला असून त्याचा शोधण्यात पोलिसांना अद्याप यश मिळलेले नाही.

असा चालतो हा गोरख धंदा

औरंगाबाद शहरातील गल्ली बोळापासून ते उच्चभ्रू वसाहती पर्यंत हे रॅकेट सक्रीय आहे. शहरात सुमारे 100 ते 200 एजंटमार्फत सट्टा घेतला जात असल्याचे समोर आले आहे. ग्राहकांनी लावलेले पैसे फोन-पे, गुगल-पे या माध्यमातून एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर घेतले जातात. तर एखाद्या ग्राहकांची विनिग लागल्यास त्याला मध्यस्थी एजंट हा रोख स्वरूपात पैसे देतो. मात्र, रोख स्वरूपात ग्राहकांकडून पैसे घेतले जात नाहीत. त्यामुळे पोलिसांना रोख सापडत नाही. गेल्या चार दिवसांत एका व्यक्तीकडून सुमारे 70 ते 80 लाखांचा व्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर या रॅकेटचा धंदा कोटींमध्ये असल्याची चर्चा आहे.

Published by: sachin Salve
First published: October 20, 2020, 1:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या