पाटणा, 22 फेब्रुवारी : सोशल मीडियानं (Social Media) संपूर्ण आयुष्याचा ताबा घेतलेल्या या जगात या माध्यमातून प्रेम जमल्याची संख्या काही कमी नाही. आपल्या प्रेमाला घरच्यांचा विरोध आहे म्हणून पळून गेलेल्या जोडप्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र एकाच घरातील तीन सख्ख्या बहिणींची फेसबुकवर (Facebook) मुलाशी मैत्री झाली. तिघींच्याही मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि त्या तिघीही एकाच दिवशी आपआपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील तीन पैकी दोन बहिणी या अल्पवयीन (Minor) आहेत.
काय आहे प्रकरण?
फेसबुक, मैत्री (Friendship) आणि प्रेम (Love) याच्यात जुळलेलं हे सर्व प्रकरण बिहार (Bihar) मधील बक्सर आणि भोजपूर या गावातलं आहे. या तिन्ही बहिणी बक्सरच्या आहेत. तर मुलं ही भोजपूरची आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine day) दिवशी या तिन्ही बहिणी गावातील आणखी एका मुलीसोबत पळून गेल्या. गावातील चार मुली एकाच वेळी गायब झाल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी बक्सरच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात या तिन्ही मुली पटणामध्ये (Patana) असल्याचं निष्पन्न झालं. त्याचबरोबर या मुलींसोबत मुलं असल्याची माहिती देखील समोर आली. या माहितीची खात्री होताच पोलिसांनी पाटणामध्ये जात एका जोडप्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी अन्य जोडपी आरा या गावात असल्याचं समजलं. पोलिसांनी त्या गावातून त्यांनाही ताब्यात घेतलं. या सर्व मुलांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे.
हे तरुण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गाडी घेऊन मुलींच्या गावात आले होते. त्यानंतर ते मुलींना घेऊन पाटणा आणि आरामध्ये गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.