सीतामंढी, 19 नोव्हेंबर : सावधान इंडिया किंवा क्राइम पेट्रोल सारख्या सीरियल असो किंवा गुन्हेगारीवर आधारीत सिनेमे असोत ते पाहून अनेकदा गुन्हे केल्याचे किंवा गुन्हेगारी करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण अशा प्रकारच्या सिनेमाचं वेड हे घातक आणि जीवघेणं ठरू शकतं. शूट आऊट अॅट लोखंडवाला हा सिनेमा पाहिल्यानंतर तरुणानं भाई होण्याचं डोक्यात घेतलं आणि सगळा घोळ झाला.
या तरुणानं सिनेमा आणि सिरियलची प्रेरणा घेऊन गुन्हेगारी सुरू केली. हळूहळू त्याचं गुन्हेगारी करण्याचं प्रमाण वाढत गेलं आता छोटे मोठे नाही तर थेट व्यवसायिकांना लुटण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. शूट आउट अॅट लोखंडवाला' या चित्रपटाने भारवलेला अभिषेक उर्फ राजा गुंडांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन गुन्हेगारीच्या दुनियेत नाव कमवण्याच्या मागे लागला होता. अभिषेकने सीतामढीतील एकूण 18 कोचिंग संचालक आणि अनेक व्यावसायिकांकडून खंडणी मागितली होती. अभिषेकच्या या कृत्याने सीतामंढी शहरात खळबळ उडाली होती.
अंधाऱ्या रात्रीत अभिषेक खंडणी मागायचा आणि आपल्याला कोणी पाहणार देखील नाही अशा आविर्भावात असायचा. मात्र एक दिवस खंडणी मागताना अभिषेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा चेहरा पोलिसांना दिसला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अभिषेकला बेड्या ठोकल्या.
हे वाचा-चर्चा तर होणारच! कुठे श्वानाचं डोहाळं जेवण तर कुठे धुमधडाक्यात बर्थ डे.. VIDEO
सीतामढीच्या एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेकला टीव्ही चित्रपटांची खूप आवड आहे. त्याचं गुन्हेगारी जगात आपला वेगळा ठसा उमटवण्याचं स्वप्न होतं. तो सीतामंढीच्या गुन्हेगारांकडून याचं प्रशिक्षण देखील घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी अभिषेक उर्फ राजा याच्याकडून पिस्तूल आणि काडतुसेही हस्तगत केली आहेत. हे पिस्तूल अभिषेकने गेल्या अनेक महिन्यांपासून पॉकेटमनी वाचवून त्यातून ही काडतुसं विकत घेतली होती. अभिषेकने ज्याच्याकडून हे सामान घेतलं त्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.