भागलपूर, 24 डिसेंबर : तिहेरी तलाकविरोधात केंद्र सरकारनं कायदा आणला खरा मात्र कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक तिहेरी तलाकच्या घटना समोर आल्याचं पाहायला मिळालं. तिहेरी तलाकची आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी विरोध करते या रागातून पतीनं तिला व्हिडीओ कॉलवर तलाक दिला आहे. या घटनेमुळे पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
व्हिडीओ कॉलवर पतीनं तलाक दिल्यानं पीडित महिलेनं न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती मोईन अंसारीने तलाक तलाक तलाक म्हणत काडीमोड घेतल्याची फिर्याद पीडितेनं पोलिसांना दिली. ही धक्कादायक घटना बिहारच्या भागलपूर गावात घडली आहे.
या संदर्भात पीडितेने सांगितले की लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी हुंड्याच्या मागणीसाठी तिला त्रास देणं सुरू केलं. तिच्या सासरच्यांव्यतिरिक्त पती आणि इतर नातेवाईकांनी देखील मारहाण केली. तिच्या सासरच्या लोकांना या पीडितेनं विरोध केला. हुंड्यासाठी नकार दिला आणि पती-सासरविरोधात विरोध केल्याच्या रागातून पतीनं व्हिडीओ कॉलवर तलाक दिला. दोन महिन्यांपासून पीडित महिला पोलीस ठाण्याच्या पायऱ्या न्यायासाठी झिजवत आहे.
हे वाचा-हायटेक फंडे वापरुन करायचा ब्लॅकमेल, खंडणीची मागणी करणाऱ्या सुशिक्षित तरुणाला अटक
पीडितेची फिर्याद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कारवाई करण्याऐवजी पीडितेलाच पोलीस ठाण्यातून हुसकाऊन लावलं. अखेर पीडित महिलेनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निश्चय केला आणि DIG सुजीत कुमार आपली तक्रार मांडली. या प्रकरणी DIG यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.