मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सलूनमध्ये दाढी करायला जाणं पडलं 9 लाखांना! वाचा या व्यक्तीसह नेमका काय प्रकार घडला?

सलूनमध्ये दाढी करायला जाणं पडलं 9 लाखांना! वाचा या व्यक्तीसह नेमका काय प्रकार घडला?

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

अलीकडच्या काळात मोठ्या शहरांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बिहारमध्ये एका व्यक्तीला सलूनमध्ये दाढी करायला जाणं महागात पडलं आहे.

  नवादा, 12 डिसेंबर: अलीकडच्या काळात मोठ्या शहरांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. चोरीच्या  घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रस्त्यावर चालत असलेल्या महिलांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरणं, दुकानं फोडणे, बॅंका-एटीएमबाहेर नागरिकांकडचे पैसे लुटणं अशा घटनांविषयी आपण नेहमी वाचतो, ऐकतो. बिहारमध्ये (Bihar) काहीशी अशीच घटना घडली आहे. एक व्यक्ती कार रस्त्याच्या कडेला पार्क करून सलूनमध्ये गेली असता, चोरांनी गाडीची काच फोडून त्यातली नऊ लाखांची रक्कम चोरून पोबारा केला.

  बिहारमधल्या नवादा (Nawada) येथे शुक्रवारी (11 फेब्रुवारी) चोरांनी एका कारच्या काचा फोडून त्या कारमधली नऊ लाखांची रक्कम चोरली. नवादामधल्या गया रोडवरच्या सीमा टॉकीजजवळ ही घटना घडली. राजौली-बख्तियारपूर मार्गाचं चौपदरीकरण करणाऱ्या गाबर कन्स्ट्रक्शन (Gaber Construction) या कंपनीचे व्यवस्थापक ओम प्रकाश यांच्याबाबतीत ही घटना घडली आहे. पीडित व्यवस्थापक हरियाणातल्या फतेहबाद इथले रहिवासी आहेत. ओम प्रकाश सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली.

  हे वाचा-मोठ्या आवाजात ऐकत होती गाणं; इअरफोनमुळे 21 वर्षीय मोनिकाचा गेला जीव

  अलीकडच्या काळात नवादा शहरातल्या सुरक्षा व्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांच्या कामकाजावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. गुन्हेगार संधीच्या शोधात बॅंका आणि एटीएमच्या परिसरात फिरत असतात. बॅंकेतून पैसे काढून घरी परतणाऱ्या अनेकांना लुटल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु, गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.

  दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी पीडित व्यवस्थापकासह परिसरातल्या अन्य नागरिकांकडून घटनेविषयी माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळाजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची (CCTV Footage) तपासणी सुरू केली आहे. या परिसरात शासनाने सीसीटीव्ही बसवले आहेत; मात्र ते नादुरुस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती एसआय नरोत्तम यांनी दिली.

  हे वाचा-साताऱ्यात तरुणांच्या दोन गटांत जोरदार राडा, तुंबळ हाणामारीचा LIVE VIDEO VIRAL

  मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे व्यवस्थापक मनदीपसिंग आणि गुरदीप सिंग यांनी एचडीएफसी बॅंकेतून पाच लाख रुपये, तर पंजाब नॅशनल बॅंकेतून पाच लाख रुपये काढले होते. त्यानंतर ओम प्रकाश यांना बोलावून त्यांच्याकडे दहा लाख रुपये सोपवण्यात आले. पीडित व्यवस्थापकाने त्यातले एक लाख रुपये स्वतःजवळ ठेवले आणि उर्वरित नऊ लाखांची रक्कम गाडीत ठेवली. त्यानंतर व्यवस्थापक ओम प्रकाश गाडी घेऊन सद्भावना चौकाकडे निघाले. रस्त्यात सीमा टॉकीजजवळ दाढी करण्यासाठी ते एका सलूनजवळ थांबले आणि गाडी लॉक करून ते सलूनमध्ये गेले. सुमारे 20 ते 25 मिनिटांनी बाहेर आल्यावर गाडीची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. कारच्या मागील दरवाज्याची उजव्या बाजूची काच फुटली होती आणि आत ठेवलेले नऊ लाख रुपये गायब झाले होते. हे पाहताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून गर्दी जमा झाली. पीडित व्यवस्थापकाने या घटनेची माहिती कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांना, तसंच पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू झाला.

  First published:
  top videos

   Tags: Bihar, Theft