भिवंडी, 30 नोव्हेंबर : अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या चुलत भावावर गोळीबार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करून भिवंडी शहरातील आरोपी फरार झाले होते. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी शिताफीने अजमेर येथून मुख्य आरोपीस अटक केली आहे .
शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत नौशाद मुख्तार सिद्धीकी वय 38 ,रा.नागाव याच्या चुलत बहिणीसोबत त्याच्या बहिणीचा नवरा अशफाक सिद्धीकी यांचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याने त्यास नौशाद सिद्धीकी हा विरोध करत होते. त्यासोबतच आपल्या पत्नीचे सोन्याचे दागिने स्वतः कडे ठेवल्याचा राग मनात धरून अशफाक सिद्धीकी व त्याचे साथीदार अफसर इर्शाद खान व सादिक जुबेर खान या तिघांनी नौशाद सिद्धीकी याच्या घराबाहेर येऊन त्याच्या सोबत हुज्जत घातली. तसंच त्यावर अशफाक याने आपल्याकडील पिस्तुलाने एक राऊंड गोळी झाडून पसार झाले.
या हल्ल्यात नौशाद थोडक्यात बचावले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण , सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) नितीन पाटील ,सपोनि टोकले ,श्रीराज माळी ,पो उपनि निलेश जाधव, पो.हवाचौधरी,पो.ना.इथापे,पो.शि.पाटील,इंगळे,हरणे,पाटील, ताठे या पथकाने सर्वत्र आरोपींचा शोध सुरू केला.
त्यानंतर मुख्य आरोपी अशफाक सिद्दीकी हा गुन्हा घडल्या पासून भिवंडी ठाणे गुजरात मार्गे राजस्थान अजमेर येथे जाऊन लपून बसल्याचे समजल्यावर पोलीस पथकाने अजमेर येथील निलकमल हॉटेल मधून ताब्यात घेतले. तसंच चौकशी करून त्याचे भिवंडी शहरातील साथीदार अफसर इर्शाद खान व सादिक जुबेर खान यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल जप्त करण्यात आली असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहेत.