भिवंडी, 1 डिसेंबर : भिवंडी तालुक्यातील राजणोली नाका येथे एसटी बसची वाट पाहत उभा असलेल्या प्रवाशाच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा आरोपींना कोनगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
महामार्गावर मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी आपल्या पोलीस पथकास या भागात विशेष गस्त लावून या चोरट्यांचा मागोवा काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर सपोनि नितीन सूर्यवंशी ,अभिजित पाटील ,सहाय्यक पो उप निरी सूर्यवंशी ,पोहवा नलावडे,किरण पाटील ,पोना मासरे, कृष्णा महाले ,अविनाश पाटील, गणेश चोरगे ,देवरे या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने रिजावन अब्दुल मातीनं अन्सारी (20 ) ,फिरोज सलाउद्दीन शेख (19 ) अशा दोन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल व एक दुचाकी असा 65 हजार 999 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे .
भिवंडी शहर व विशेषतः महंर्गालागतच्या ग्रामीण भागात दुचाकी वरून मोबाईल हिसकवणाऱ्या टोळ्या कार्यरत असून या बाबत विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. नुकतंच भिवंडी गुन्हे शाखेने सुद्धा मोबाईल स्नॅचिंगचे नऊ गुन्हे उघडकीस आणत तीन जणांना ताब्यात घेतलं. ही घटना ताजी असताना कोनगाव पोलिसांनीही मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्याने असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या गुन्ह्यांस जरब बसली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi