भिवंडी, 1 डिसेंबर : 'सैराट' या मराठी चित्रपटातील एका दृश्याप्रमाणेच क्रूर हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबईजवळील भिवंडी तालुक्यातील दापोडा-गुंदवली रस्त्यालगतच्या निर्जन ठिकाणी घडली असून 14 वर्षीय अल्पवयीन बहिणीसोबत प्रेम करणाऱ्या 16 वर्षीय प्रेमवीराची भावाने हत्या केली आहे.
याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. त्यानंतर आरोपी भावाला नालासोपारा इथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजय रामकरण यादव (वय - 20) असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
6 महिन्यांपूर्वीच जुळले होते प्रेमाचे सूत
आरोपी अजय यादव आणि फिर्यादी लालाजी यादव हे जवळचे नातेवाईक असून उत्तर प्रदेशातील एका गावात ते शेजारी-शेजारी राहतात. फिर्यादीचा 16 वर्षीय मृतक मुलगा हा सहा महिन्यांपूर्वी गावी गेला होता. त्यावेळी तो 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यांचे प्रेमसंबंध जुळले. याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यावर मूळ गावीच दोन्ही कुटुंबामध्ये चांगलाच वाद झाला.
या भांडणाचा आणि बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधांचा राग अजय यादव याच्या डोक्यात होता. या घटनेला काही महिने लोटल्यानंतरही अजयचं डोकं शांत झालं नव्हतं. त्यामुळे त्याने मृतक मुलगा काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला दापोडा-गुंदवली येथील निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
आरोपीला नालासोपाऱ्यातून अटक
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात 28 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे यांनी आरोपी अजय रामकरण यादव याला नालासोपारा मधील एका घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Crime news