शिक्षा सुनावल्याचा राग आल्याने न्यायाधीशांवरच भिरकावली चप्पल, आता आरोपीला झाली आणखीनच मोठी शिक्षा

शिक्षा सुनावल्याचा राग आल्याने न्यायाधीशांवरच भिरकावली चप्पल, आता आरोपीला झाली आणखीनच मोठी शिक्षा

या प्रकरणी शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम गुप्ता यांनी दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

भिवंडी, 12 डिसेंबर : न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच त्यांच्या अंगावर चप्पल भिरकावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. या प्रकरणी शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एम गुप्ता यांनी दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सरकारी वकील विजय मुंडे यांनी माहिती दिली आहे.  अशरफ अन्सारी (वय,23  रा.  आमपाडा, भिवंडी) असं कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 

आरोपी अशरफ अन्सारीवर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात  चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी  भारतीय दंड विधान कलम 454, 380, 457, 34  अंतर्गत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  याच गुन्ह्यांच्या संदर्भात  भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस.जे. पठाण यांच्यासमोर 29 जानेवारी 2019 रोजी शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता. 

आरोपी न्यायधीशावर चपला फेकण्यापूर्वी मागील 14 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. घटनेच्या  दिवशी  दुपारच्या सुमारास भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस.जे.पठाण यांच्यासमोर हजर केले असता, तुला गुन्हा कबूल असेल तर दंड आणि सहा महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल असं न्यायाधीशांनी आरोपी अशरफला सांगितलं.

मात्र मी आधीच 14 महिने शिक्षा भोगली असून ती कापून मला सोडून द्यावं, अशी विनंती आरोपीने केली होती. मात्र आणखी सहा महिने शिक्षा भोगावीच लागेल, असं न्यायाधीशांनी सांगताच आरोपीला राग अनावर झाला. या रागातूनच त्याने पायातील दोन्ही चपला काढून न्यायाधीशांच्या अंगावर भिरकावल्या. या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Published by: Akshay Shitole
First published: December 13, 2020, 12:02 AM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या