बीड, 1 ऑक्टोबर : बचत गटाच्या नावाखाली महिलांना 36 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार डिसेंबर 2021 रोजी घडला होता. यामधील आरोपी पिता-पुत्राला बेड्या ठोकण्यात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गेवराईतील महिलांकडून कागदपत्रे घेऊन परस्पर विविध बँकांकडून कर्ज उचलून, 36 लाखांचा गैरव्यवहार करत पितापुत्र पसार झाले होते. अब्बास महेबूब सय्यद (वय 39) आणि आवेज अब्बास सय्यद (वय 19) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी हे मुळचे गेवराईचे आहेत. पण ते गेल्या काही काळापासून पुण्याच्या सिंहगड येथे वास्तव्यास होते.
याविषयी विमलबाई बंडू रोकडे यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी गेवराई ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली होती. त्यानंतर अब्बास महेबूब आणि आवेज सय्यद यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. 2020 मध्ये विमलबाई आणि इतर 16 महिलांकडून बचत गटामार्फत लघु उद्योगासाठी कर्जप्रकरणे मंजूर करून देतो म्हणून आधार कार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे घेत स्वाक्षऱ्या व अंगठे घेतले. त्यानंतर आरोपींनी परस्परच 35 लाख 90 हजार 105 रुपयांचे कर्ज उचलले. याविषयी महिलांकडून ओरड झाल्यावर 2 एकर शेती व घर विकून आरोपींनी पुणे गाठले.
(पाच हजारांसाठी हत्या, कन्नड घाटात घातपात, अखेर खुन्यांच्या कुकृत्यांचा सर्वनाश)
दरम्यान, गुन्हा नोंद झाल्यानंतर सात महिने उलटून गेवराई पोलिसांना एकाही आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. त्यामुळे हे प्रकरण 16 जुलै रोजी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले होते. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने दोघा पिता-पुत्रांना पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे आरोपींनी इतर कुणाची फसवणूक केलीय का? याचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime