बीड, 15 नोव्हेंबर : अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणारी बीडमधील अॅसिड टाकून तरुणीची हत्या प्रकरणी अखेर नराधम प्रियकाराला अटक करण्यात आली आहे. अविनाश राजुरे या आरोपीला अखेर नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं पोलिसांनी ताब्यात आहे. घटनेच्या अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपी अविनाश राजुरे याने आपली प्रेयसी सावित्रा अंकुलवार हिच्यावर बीडमधील येळंब (घाट) परिसरात अॅसिड टाकून पेट्रोलने पेटवून दिले होते. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली. अखेर 24 तासांच्या आता नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून अविनाश राजुरेला अटक केली आहे. त्याला लवकरच बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) तरुणी याच गावातील अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.
पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला.
भाजप नेत्यांची केला घटनेचा निषेध
दरम्यान, न्यूज18 लोकमतशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये सावित्रा अंकुलवार तरुणीच्या हत्ये प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'दिवाळी सण असताना, पाडवा आणि भाऊबीज उद्या होणार आहे. हा सण महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण काही विकृत घटना घडताना दिसत आहे. दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणे दुर्दैवी आहे' अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
रामदेव बाबांनी नरेंद्र मोदींचं भविष्य सांगून राहुल गांधी यांना दिला खोचक सल्ला
तसंच, 'महिला अत्याचार गोष्टी राज्यात सातत्याने होत आहे. अशा गोष्टी थांबवण्यासाठी वेगळी फोर्स तयार करण्याची आवश्यकता आहे. फास्ट ट्रॅकमध्ये असे खटले चालवले पाहिजेत. मी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बीडचे एसपी यांच्याशी बोलणार आहे' असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 'एका तरुणीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, 12 तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी' अशी मागणी केली आहे.