नवनवीन तंत्रज्ञानानं (Technology) आपलं काम खूप सोपं झालं आहे; मात्र हेच तंत्रज्ञान नुकसानकारकही ठरत आहे. तंत्रज्ञानातल्या त्रुटींचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांनी (cyber thieves) आतापर्यंत लाखो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आजकाल बँकांचं (banks) जवळजवळ सर्व काम मोबाइल फोनद्वारे (mobile phones) हाताळलं जात आहे. त्यामुळे फसवणुकीचं (Cyber fraud) प्रमाण वाढलं आढे.
सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या नवीन क्लृप्त्या शोधून काढत आहेत. अशीच एक क्लृप्ती त्यांनी शोधून काढली आहे. ती खूपच धोकादायक असून, याद्वारे तुमचं संपूर्ण बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. त्याचं नाव सिम स्वॅप (SIM swap crime) असं आहे. फसवणुकीच्या या प्रकाराबद्दल आणि त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फसवणुकीची ही पद्धत सिम कार्डशी जोडलेली आहे. तुमच्या नावावर चालणारा फोन नंबर (सिम कार्ड) बंद करून, या चोरट्यांना त्याच क्रमांकाचं जारी केलेलं दुसरं सिम मिळतं. नवीन सिममार्फत OTP च्या मदतीने हे चोरटे तुमच्या बँक खात्यावर डल्ला मारतात. त्यानंतर ते सिम बंद करतात. कल्पना करा, की तुमचं सिम या चोरट्यांकडे गेलं तर काय होईल?
हे वाचा - डोंबिवली हादरली, तरुणाचा आढळला छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह
... आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुणी तुमचा मोबाइल नंबर बंद करून नवीन सिम कार्ड कसं घेऊ शकतो? तुमचा हा प्रश्न रास्त आहे. त्यामुळे हे एका उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. गोविंद नावाच्या एका व्यक्तीला अज्ञात क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने गोविंदला सांगितलं, की तुला एक लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही लॉटरी व्हॉट्सअॅपने काढली असून, व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. कोट्यवधी नावांपैकी फक्त काही जणांना 1 लाख रुपयांच्या बक्षिसासाठी निवडण्यात आलं आहे.
हे बक्षीस मिळवण्यासाठी काय करावं लागेल, असं गोविंदने विचारलं. फोन करणाऱ्याने सांगितलं, की तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो पाठवावा लागेल. तुम्हाला एक पैसाही भरावा लागणार नाही आणि 5-6 दिवसांत तुमच्या बँक खात्यात 1 लाख रुपये जमा केले जातील. हे ऐकून गोविंदला वाटलं की, फक्त त्याला त्याची माहिती सांगून 1 लाख रुपये मिळवायचे आहेत. त्यानंतर गोविंदने आधार, पॅन, बँक तपशील आणि पासपोर्ट आकाराचा फोटो शेअर केला.
इथून सिम स्वॅप होण्याचा खेळ सुरू होतो. सिम बंद करण्यासाठी किंवा सुरू करण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि फोटो लागतो. सिम कार्ड आधी बंद करण्यासाठी हे चोरटे तुमचं आधार कार्ड आणि फोटो वापरतात. सिम बंद केल्यानंतर तोच नंबर चोरटे त्यांच्या नावावर घेतात. अशा प्रकारे तुमचं सिम कार्ड दुसऱ्याच्या नावावर जातं. नेटवर्क नसेल किंवा फोन खराब झाला असेल म्हणून तुम्हाला सिग्नल दिसत नाही असं वाटतं. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्लक्ष करता.
गोविंदला त्याच्या बँकेचा तपशीलही विचारण्यात आला. आता गोविंदाच्या बँक खात्यात ऑनलाइन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जाईल. पासवर्ड फोन नंबरद्वारे बदलला जाईल आणि ज्या क्रमांकावर ओटीपी येणार आहे, तो चोरट्यांनी त्यांच्या नावावर आधीच घेतला आहे. आता तुमचं बँक खातं रिकामं केलं जाईल आणि सिम तोडून फेकून दिलं जाईल.
हे वाचा - पैशांसाठी LOVE JIHAD! अजाबुलनं राजेश बनून केलं विधवेशी लग्न
अशा पद्धतीने सिम स्वॅप करून तुम्हाला गंडा घातला जातो. ही फसवणूक टाळायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
1. तुमची कागदपत्रे (आधार, पॅन, बँक तपशील इ.) कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला शेअर करू नका.
2. लोभी होऊ नका. लॉटरीमध्ये प्रवेश केल्याशिवाय लॉटरी मिळू शकत नाही आणि व्हॉट्सअॅप कधीही अशा लॉटरी काढत नाही.
3. तुमच्या मोबाइलला नेटवर्क दिसत नसेल, तर तुमच्या सेवा प्रदात्याशी त्वरित संपर्क साधा. इतर कोणत्याही फोनवरून कॉल करून माहिती घेऊ शकता.
4. तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती इतर कोणालाही देऊ नका.
5. कोणाच्या सांगण्यावरून तुमच्या फोनवर कोणतंही अॅप इन्स्टॉल करू नका.
6. कोणी विचित्र लिंक पाठवली असेल, तर ती कधीही उघडू नका
अशी सिम स्वॅपची घटना तुमच्यासोबतही घडू शकते. त्यामुळे वरील सूचनांचं पालन केलं तर तुम्ही या फसवणुकीपासून वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime