हिना आजमी (डेहराडून) 24 मार्च : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. विकासनगर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शौचालयात बाळाला जन्म देऊन आई फरार झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सांभाळण्याच्या भितीने महिलेने मुलाला सोडले असल्याची शंका व्यक्त होत आहे. दरम्यान याबाबत डेहराडून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय तरुणी प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. तीच्यासोबत एक तरुणही आला होता. तरुणाने भरलेल्या अर्जात गर्भवतीचे नाव प्रीती तर तिचे वय 23 वर्षे असे लिहिले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुलगी शौचालयात गेली, तिथे तिने एका मुलीला जन्म दिला. यानंतर मुलीला टॉयलेटमध्ये सोडून ते पळून गेली असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
दरम्यान सफाई कामगार शौचालय साफ करण्यासाठी गेली असता मुलगी शौचालयात पडलेली पाहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यांनी ताबडतोब बाळाला उचलून प्रसूती कक्षात आणले. यावेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर मंजू राणा यांनी नवजात बालकाची गंभीर स्थिती पाहून तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.
दरम्यान नवजात बाळ असेल सापडल्याची माहिती मिळताच अनेक समाजसेवकही रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर काही समाजसेवकांच्या माध्यमातून मुलीवर उच्च रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विकासनगरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय सिंह यांनी सांगितले की, सफाई कामगाराने नवजात बालक शौचालयात पडल्याची माहिती दिली होती. बाळाची जन्मदाती आई तिथे नव्हती. तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही.
नवजात अर्भकाची प्रकृती खालावली होती, त्यामुळे तीच्यावर उपचार करून नंतर प्रेमनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची सर्व माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18