भिवंडी, 13 डिसेंबर : मुंबई-नाशिक महामार्गावर वाहन चालकांना लुटण्याचा घटना वारंवार होत असतात. अशातच मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो चालकाला लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार रफिक अहमद झहीरुद्दीन खान हा टेम्पो चालक यवई नाका येथील सिंग ट्रान्सपोर्ट समोर आपला टेम्पो उभा करून झोपला होता. त्यावेळी तिथं दुचाकीवरून आलेले आकाश राजेश कंडारे वय 25, फारमान सलीम शेख वय 21, वसंत चंद्रकांत मिश्रा वय 21, सर्व राहणार कल्याण या आरोपींनी फिर्यादीस धमकावून टेम्पोचा दरवाजा उघडण्यास सांगितले. टेम्पो चालकाने भीतीने टेम्पो राजनोली नाक्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळविला असता या त्रिकूटने त्यास रस्त्यात गाठून टेम्पो समोर दुचाकी आडवी उभी करून चालकास टेम्पो बाहेर खेचत मारहाण केली. तसंच त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम असा 11 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून त्याच्या टेम्पोचे नुकसान केलं.
आरोपी गुन्हा केल्यानंतर पळून जात असतानाच या घटनेची खबर कोनगाव पोलीस ठाण्यास मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व त्यांच्या पथकातील पीएसआय डी पी नागरे,पोलीस कर्मचारी शिंदे, मोरे, पवार,दहीफळे, ढवळे या पथकाने कल्याणच्या दिशेने दुचाकीवरून पळून जात असलेल्या तिघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्या जवळून दोन चॉपर, एक फायटर, मारदांडा असे शस्त्र जप्त करीत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे .
या कामगिरी बद्दल पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोल यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे व गस्त प्रमाण वाढविल्याने अनेक गुन्हेगार अटक करण्यात पोलिसांना यश येत असल्याचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.