भंडारा हादरलं! अंगात आलेल्या महिलेनं नावं घेतली, 25 गावकरी चौघांना जिवंत जाळणार तितक्यात..

भंडारा हादरलं! अंगात आलेल्या महिलेनं नावं घेतली, 25 गावकरी चौघांना जिवंत जाळणार तितक्यात..

शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गावातील जवळपास वीस-पंचवीस लोकांनी त्याच गावातील चार लोकांना नग्न करून अमानुष मारहाण केली.

  • Share this:

प्रवीण तांडेकर, प्रतिनिधी

भंडारा, 26 जुलै : कल्याणमध्ये अंधश्रद्धेतून मायलेकाची हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राला हादरावून सोडणारी आणखी एक घटना भंडाऱ्यात घडली आहे. जादू टोण्याच्या संशयावरून चार लोकांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला. सुदैवाने पोलीस घटनास्थळी पोहोचल्यामुळे चौघांचा जीव वाचला.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राजापूर गावात ही घटना घडली आहे.   या घटनेत जखमी झालेल्या चारही लोकांना उपचारासाठी तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजापूर हमेशा या गावात शनिवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास गावातील जवळपास वीस-पंचवीस लोकांनी त्याच गावातील चार लोकांना नग्न करून अमानुष मारहाण केली. तसंच त्यांच्या अंगावर पेट्रोल घालून जिवंत जाळण्याचा ही प्रयत्न केला.

अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी, कल्याणमधील धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ

ही सगळा प्रकार सुरू असताना सुदैवाने गावातील सुज्ञान नागरिकांनी पोलिसाना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली, त्यामुळे वेळीच चौघांचा जीव वाचला.

मारहाण झालेल्या पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, या गावात राहणाऱ्या एका महिलेच्या अंगात अचानक संचारले होते. ही महिला गावातील वेगवेगळ्या लोकांच्या घरी जात होती. तिच्यासोबत तिच्या घरातील कुटुंबही होते आणि इतर गावकरीही होते. ही महिला पीडित लोकांच्या घरी पोहोचली आणि त्यांचे नावं घेऊ लागली. त्यानंतर गावकऱ्यांनी या चौघांना घराबाहेर बोलावलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथा-बुक्या आणि काठ्याने चौघांना अमानुष मारहाण केली. या चौघांनी सोडून देण्यासाठी गयावया केली. पण, कुणीही काहीच ऐकलं नाही. फक्त अंगात आले म्हणून महिलेनं सांगितलं म्हणून मारहाण सुरूच ठेवली. एवढंच नाहीतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न होता. पण, तितक्यात तिथे पोलीस पोहोचले आणि पुढील अनर्थ टळला.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, आता लॉकडाउन वाढवू नका'

कुंदन गौपले, ओम प्रकाश मेश्राम, मनोहर थोटे आणि  कचरू राऊत असं मारहाण झालेल्या चौघांची नावं आहे. पोलिसांनी या चौघांचीही टोळक्याच्या तावडीतून सुटका केली आणि उपचारासाठी तुमसर येथे रुग्णालय  दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक सह मोठ्या प्रमाणात पोलिस त्या गावात पोहोचून तपास सुरू केलेला आहे. गावात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त लागलेला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 17 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात   महिला पुरुषांचा समावेश आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

अंगात भूत असल्याच्या संशयावरून मायलेकाची हत्या

दरम्यान, कल्याणमध्ये अंगात भूत असल्याच्या संशयावरून लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करून मायलेकाला जीवे ठार मारल्याची घटना कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात घडली आहे. अटाळी येथे अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अघोरी बाबासह चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

कार दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघाताचा थरारक LIVE VIDEO

पंढरीनाथ शिवराम तरे (50) आणि चंदूबाई शिवराम तरे (76) अशी मृतांची नावं आहेत. मायलेकाच्या अंगात भूत येत असल्याच्या संशयावरून दोघांना नातेवाईकांनी अटाळी येथील अघोरी बाबाकडे नेलं होतं. अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनीच मायलेकांना भूत उतरवण्याच्या नावाखाली लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

Published by: sachin Salve
First published: July 26, 2020, 2:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या