पुणे, 21 डिसेंबर: पुणे शहारातील एका तरुणावर कोयत्यानं वार केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे. या हल्ल्यात प्रितम जाधव गंभीर जखमी झाला आहे. पीडित जाधव हा 24 वर्षांचा असून तो टॅम्पोचालक म्हणून काम करतो. शनिवारी सकाळी नऊ वाजता त्याच्यावर हा हल्ला झाला. जुन्या भांडणाच्या रागातून एका व्यक्तीनं टेम्पोचालकास अडवून त्याच्यावर कोयत्यानं वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना लोहगाव परिसरात घडली असून याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात एका व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रितम जाधव (वय 24, रा. लोहगाव) असं या घटनेत जखमी झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीवर उपचार सुरू आहे. संबंधित प्रकरणाचा तपास विमानतळ पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितम जाधव हे शनिवारी सकाळी त्यांच्या टेम्पोमध्ये माल भरुन लोहगाववरून भुकुम वस्तीकडे जात होते. त्यावेळी अचानक दुचाकीवरुन आलेल्या आरोपीनं जाधव यांचा टेम्पो अडवला. त्याला शिवीगाळ करून टॅम्पोच्या बाहेर खेचला. तिथे त्याला भर रस्त्यात मारहाण केली.
"तुला आता जिवंत सोडणार नाही, तुझी सुपारी दिली होती, तू वाचलास कसा" असं म्हणत आरोपीनं आपल्याकडील कोयता काढला आणि फिर्यादी जाधव यांच्या अंगावर धावत गेला. त्यानं आपल्या हातातील कोयत्यानं जाधव यांच्या डाव्या खांद्यावर वार केला. या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी फिर्यादी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण आरोपीनं त्यांचा पाठलाग करुन जाधव यांच्या कंबरेवर कोयत्यानं वार केला. तसेच पोटात आणि पाठीत लाथाबुक्क्यानी त्याला जबर मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. ए. पाटील करीत आहेत.