मुंबई, 9 डिसेंबर: शाळा, कॉलेजमध्ये शिकण्याच्या वयात प्रेमात पडणं हे आता नवं नाही. प्रेमानंतरची पुढची पायरी म्हणजे लग्न. ही पायरी गाठण्यासाठी स्त्री आणि पुरुषांना कायद्याचे बंधन आहे. काहीवेळी प्रेमात पडलेली मुलं-मुली कायद्याचे हे बंधन पाळत नाहीत. सतरा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी वर्गातच लग्न केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे.
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या राजमहेंद्रमधील एका ज्युनिअर वर्गात हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणातला मुलगा 17 वर्षाचा असून त्याने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्याबरोबर लग्न केले. त्या दोघांनी नंतर लग्नाचा एकत्र फोटो देखील काढला. या लग्नाला त्यांच्या वर्गातले मित्र देखील उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांमधील एकाने या लग्नाचा व्हिडिओ शूट केला आणि मित्रांमध्ये व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लग्नाचा प्रकार उघडकीस आला.
(हे वाचा-संतापजनक! जेवणाला हात लावला म्हणून दलित तरुणाची हत्या)
कॉलेज प्रशासनाकडून कारवाई
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लग्न करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर कॉलेज प्रशासनाने कारवाई केली असून त्यांना कॉलेज सोडून जाण्यास सांगितलं आहे. आंध्र प्रदेशच्या महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही अल्पवयीन मुलांना कौन्सलिंगसाठी पाठवण्यात आलं आहे. मुलीच्या घरच्यांनी तिला स्वीकारण्यास देण्यास नकार दिल्याने महिला आयोगाने मुलीला आश्रय दिला आहे.
(हे वाचा-4 महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, चारित्र्यावर संशय घेऊन आवळला पत्नीचा गळा)
पोलिसांना आली जाग!
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांना जाग आली असून त्यांनी आता या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. ‘कॉलेजच्या वर्गात लग्न करण्यासाठी मुलांना कुणी संरक्षण दिलं?’ याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.