चित्तूर, 25 जानेवारी: एकीकडे देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत असताना, देशातील अनेक ठिकाणी अंधश्रद्धेच्या घटना वाढताना दिसत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या प्रकरणातील एका दाम्पत्याने अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपल्या पोटच्या दोन मुलींची निर्घृण हत्या केली आहे. विशेष म्हणजे हे दाम्पत्य उच्चशिक्षित असून दोघंही मुख्यध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या हातून अशाप्रकारची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या दुर्दैवी घटनेत 27 वर्षीय अलेख्या आणि 22 वर्षीय साई दिव्या या दोघी अंधश्रद्धेच्या बळी ठरल्या आहेत. या मुली लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरी आल्या होत्या. मोठ्या मुलीने भोपाळ येथून मास्टर्सची पदवी घेतली आहे, तर छोटी मुलगी साई दिव्याने बीबीएचं शिक्षण घेतलं आहे. साई दिव्या ही मुंबईतील एआर रेहमान म्युझिक स्कुलची विद्यार्थीनी होती. लॉकडाऊनच्या काळात घरी येणं या दोन्ही बहिणींच्या जीवावर बेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लॉकडाऊनच्या काळात हे कुटुंब काहीसं विचित्र प्रकारे वर्तणूक करत होतं.
संबधीत घटना आंध्रप्रदेशातील चित्तूर येथील आहे. काही काळापासून आरोपी आई पद्मजा आणि वडील पुरुषोत्तम नायडू दोघंही कसल्यातरी अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. यातूनच त्यांनी आपल्या पोटच्या दोन मुलींची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी आईने दोन्ही मुलींच्या डोक्यात डम्बेल्सने वार करून करून त्यांची हत्या केली आहे. रात्रीच्या वेळी घरातून किंचाळलेला आवाज आल्याने शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या प्रकरणी पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा हे दाम्पत्य पोलिसांना घरात येऊ देत नव्हते. तरीही पोलिसांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला तर, घरातील परिस्थिती खूपच धक्कादायक होती. दोन्हीही मुली रक्तात माखलेल्या होत्या आणि त्यांना एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवलं होतं. यातील एका मुलीचा मृतदेह देवघरात ठेवला होता तर, दुसऱ्या मुलीचा मृतदेह एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आला होता.
या घटनेनंतरही आरोपी दाम्पत्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती, याउलट या दोन्ही मुली उद्या सूर्य उगवण्याच्या आत जिवंत होतील असा दावा ते करत होते. कारण 'आज कलयुग संपणार असून सोमवारपासून सतयुगाला सुरुवात होणार आहे' असं म्हणणं या दाम्पत्याचं होतं. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.