औरंगाबाद ०४ मार्च : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. डॉक्टरांनी रुग्णावर बलात्काराचा (Sexual Harassment of COVID-19 Patient)प्रयत्न केल्याची घटना औरंगाबाद शहर पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रावर (Aurangabad Covid Center) घडली आहे. घटनेनंतर रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण केली. आता याप्रकरणावर विरोध पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. तुम्हाला अजून किती बलात्कार आणि किती विनयभंग पाहिजे, असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला आहे. मात्र, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया काही वेगळाच इशारा करत आहे.
फडणवीस म्हणाले, तुम्हाला अजून किती बलात्कार आणि विनयभंग पाहिजेत. कोणतीही सुरक्षा पुरवली जात नाही. कोणतीही एसओपी नाही. या घटनेची तातडीनं माहिती द्या, असं म्हणत फडवणवीसांनी सरकारला जाब विचारला. यावर उत्तर देताना तिथे बलात्कार झालेला नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार म्हणाले, की महिलेचा पती आणि संबंधित डॉक्टर मित्र आहेत. हे प्रकरण वेगळं असून महिलेनं कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र, डॉक्टरला बडतर्फ करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पवार यांच्या या विधानामुळं प्रकरणाला आता नवीन वळण प्राप्त झालं आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मनपा आयुक्त पांडे यांनी दिले आहेत. संबंधित डॉक्टर महिलेचा फोन नंबर घेऊन रोज तिला फोन करून त्रास द्यायचा असाही आरोप या महिलेने केला आहे. डॉक्टरनं बुधवारी सुट्टी देण्याच्या नावाखाली या महिलेला केबिनमध्ये बोलावलं आणि या शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान महिलेने बदनामीपोटी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र महापालिका आयुक्तांना सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर त्या डॉक्टरची सेवा संपवण्यात आली आहे.