अहमदनगर, 18 ऑक्टोबर : टीव्हीवरून प्रत्येक घरात वाद होत असतात. कोणाला बातम्या तर कोणाला कार्टुन तर कुणाला सिनेमा नाहीतर सिरियल पाहायची असते. पण याच टीव्हीवरून वाद शिगेला पोहोचला आणि हत्येचा थरार घडला. अल्पवयीन भावाने आपल्या लहान बहिणीची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात भावाने आपल्या बहिणीच्या डोक्यात हातोडा मारला आणि 9 वर्षांच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला.
अहमदनगर जिल्ह्यातील शहरातील केडगाव मधील शाहूनगर जवळील सचिननगर परिसरात एका मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या वस्तीत ही घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. घरात टीव्ही पाहण्यावरून वाद झाला आणि हा वाद विकोपाला पोहोचला. रागाच्या भरात भावाने बहिणीच्या डोक्यात जोरात हातोडा मारला. यामुळे 9 वर्षांच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. शाहूनगर जवळील वस्तीत राहणाऱ्या बिराजदार यांच्या घरात ही घटना समोर आली. सायंकाळी 6 ते 6.30च्या सुमारास आई-वडिल घरात नसताना दोघा भाऊ बहिणीत टिव्ही पाहण्यावरून वाद झाला.
हे वाचा-धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून झाला वाद; बेदम मारहाण करत महिलेची जीभच छाटली
या प्रकरणाची शेजाऱ्यांनी काय घडलं हे पाहाण्यासाठी घरात आले तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात लहान बहीण पडली होती. त्यांनी या मुलांच्या आई-वडिलांना तातडीनं फोन लावून ही घटना कळवली. मृत मुलीचे वडिल हे एका खाजगी कंपनीत कामगार असुन मध्यमवर्गीय आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबात ही घटना घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणाची खबर कोतवाली पोलिसांना देण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन रणसिंग घटनास्थळी दाखल झाले. असून या प्रकरनाचा तपास पोलीस करत आहेत.