Kidnapping झालेली मुलगी तीन वर्षांनी सापडली, दोन मुलांची झाली आई

Kidnapping झालेली मुलगी तीन वर्षांनी सापडली, दोन मुलांची झाली आई

बिहारच्या जहानाबाद इथून जून 2018 मध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं. आता तब्बल 3 वर्षांनी तिचा शोध लागला, मात्र तिची परिस्थिती पाहून घरच्यांना धक्काच बसला.

  • Share this:

पटना 19 फेब्रुवारी : बिहारमधून एका मुलीचं 3 वर्षांपूर्वी अपहरण (Kidnapping) करण्यात आलं होतं. यानंतर या मुलीला अनेक ठिकाणी विकण्यात आलं. आता या मुलीचा शोध लागला असून लग्नाविनाच ती 2 मुलांची आई झाली आहे. बिहारमधून अपहरण झालेली ही अल्पवयीन मुलगी 3 वर्षांनंतर राजस्थानच्या दौसामध्ये सापडली. यात बिहार पोलिसांनी (Bihar Police) काही मदत केली नाही. मात्र, दौसा पोलिसांच्या कामाचं कौतुक होत आहे. बिहार पोलिसांनी मात्र मुलीवरच संशय घेत कुटुंबीयांना सुनावलं. तीन वर्षानंतर अखेर ती सापडली मात्र ती दोन मुलांची आई झाली होती. जेव्हा मुलगी आपल्या भावाला भेटली, तेव्हा दोघंही मोठ्यानं रडू लागले.

बिहारच्या जहानाबाद इथून जून 2018 मध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झालं होतं. यानंतर मुलीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देत आरोपींबद्दलही माहिती दिली. या आरोपींमध्ये एक हिमाचल प्रदेश तर इतर बिहारमधीलच होते. आरोपींची टोळी महिलांचं अपहरण करून त्यांनी विकायची. यात एक महिलादेखील सामील होती. याच महिलेनं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला नोएडा आणि राजस्थानच्या दौसा इथे पाठवलं.

मुलीच्या अपहरणानंतर तिचे कुटुंबीय काळजीत होते. त्यांनी एसएसपीपासून बिहारच्या डिजीपीपर्यंत वारंवार जाऊन आपली मुलगी पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. बिहार पोलिसांनीही यात त्यांची काहीही मदत केली नाही आणि तुमची मुलगी स्वतः पळून गेली असेल असं सांगितलं. यानंतर पीडितेचा भाऊ वारंवार पोलीस ठाण्यात चकरा मारत राहिला आणि कॉल डिटेल तसंच मोबाईल लोकेशन तपासत राहिला. जेव्हा तिच्या भावाला समजलं, की ती राजस्थानच्या दौसा इथे आहे तेव्हा तो पुन्हा पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना घेऊन दौसामध्ये पोहोचला.

यानंतर बिहार पोलीस दौसाच्या पोलिसांच्या मदतीनं गांगल्यावास गावात पोहोचले आणि त्यांनी पीडितेची सुटका केली. तिची हालत पाहून भावाला अश्रू अनावर झाले. पीडितेनं माध्यमांना काहीही सांगितलं नाही, मात्र आपल्या भावाला संपूर्ण प्रकार सांगितला. महिलेसोबत तिला विकत घेतलेल्या लोकांनी लग्न केलं नाही. मात्र, आता ती 2 मुलांची आई आहे. या पीडितेला अनेक ठिकाणी विकलं गेलं. दौसामध्येही तिला 5 लाख देऊन विकत घेतलं गेलं होतं. महिलेच्या अपहरणात कोण कोण सहभागी होतं आणि तिला कोणी कोणी विकत घेतलं याबद्दलचा तपास पोलीस करत आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: February 19, 2021, 10:21 AM IST

ताज्या बातम्या