भिवंडी, 2 डिसेंबर : भिवंडीत (Bhiwandi News) मित्रांच्या थट्टेमुळे टायरमध्ये हवा भरणारा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसविल्याने तरुणाला आपला प्राण गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप तरुणाच्या गुदद्वारात लावून पोटात हवा भरण्यात आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
अब्दुल रफिक मन्सुरी (वय 32) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भिवंडी शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात अब्दुल मन्सूरी या तरुणाचा हवा पोटात भरण्यात आल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. अब्दुल हा भिवंडीतील खाडीपार भागातील एका चाळीत राहत होता. त्याच भागात असलेल्या सिल्क मिल्स लूम कारखान्यात लूम कामगार म्हणून कार्यरत होता. तर दोन्ही आरोपीही याच लूम कारखान्यात लूम कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यातच 26 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास अब्दुल व आरोपींची कारखान्यात थट्टा सुरू होती. त्यातूनच दोघा आरोपींनी कारखान्यात असलेल्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप अब्दुलच्या गुदव्दारात घुसविला. त्यानंतर मशीन सुरू केली.
हे ही वाचा-एका पिझ्झासाठी मुलाला मारलं; बापाने जमिनीवर आदळून केली बाळाची हत्या
त्यावेळी गुदव्दारावाटे हवा प्रेशरने पोटात जाऊन आतड्याना गंभीर दुखापत झाली होती. भिवंडीतील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा 1 डिसेंबर 2021 रोजी मृत्यू झाला. थट्टा करण्याच्या प्रयत्नात तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मृत तरुणाचा साडू शबोउद्दीन मन्सुरी याने निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhiwandi, Crime news