नालासोपारा, 09 फेब्रुवारी : फेसबुकवर लहान मुलांचे अश्लिल फोटो आणि व्हिडिओ प्रसारीत केले जात असल्याचे उघड झाले आहे. खुद्द फेसबुकने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून वसई विरार परिसरातील 17 फेसबुक खात्यांवर नालासोपारा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकारे गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतात फेसबुक आणि व्हॉटसअप हे सर्वात प्रभावी समाज माध्यम आहेत. फेसबुकचे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. संदेशवहन आणि सर्वांशी एकत्रित सुसंवाद साधण्यासाठी फेसबुकचा वापर होतो. मात्र याच फेसबुकवरून लहान बालकांचे अश्लिल साहित्य (चाईल्ड पोर्नोग्राफी) प्रसारीत केले जाऊ लागले आहे. भारताततून सर्वाधिक चाईल्ड पोर्नोग्राफी ही फेसबुकच्या माध्यमातून केली जात असल्याचे फेसबुकनेच जाहीर केले आहे.
इतर बातम्या - मुंबईकरांची माणूसकी मेली, अपघातात जखमी पोलिसाला तडफडत ठेवलं, अखेर...
ही ''चाईल्ड पोर्नोग्राफी'' रोखण्यासाठी फेसबुकने केंद्र सरकारला विनंती केली होती. ज्या राज्यातून, शहरातून आणि ज्या ठिकाणाहून (आयपी अॅड्रेस) बालकांचे अश्लील साहित्य, चित्रफिती, छायाचित्रे प्रसारीत (अपलोड) केली जात आहेत, त्यांची यादीच फेसबुकने केंद्र सरकारला दिली होती. भारतात सर्वाधिक फेसबुक चाईल्ड पोर्नोग्राफी ही दिल्लीतून होते तर महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकातून होत असल्याचे फेसबुकने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
या प्रकरणी अद्याप कुणाला अटक कऱण्यात आलेली नाही. ज्या आयपी अॅड्रेसवर (खात्यावर) गुन्हे दाखल झाले आहेत ते सर्व 20 ते 35 वर्ष वयोगटातील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे फेसबुक वापरणाऱ्यांनी आपले अकाऊंट सेफ आहे ना याची खात्री नक्कीच केली पाहिजे.
इतर बातम्या - मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा, पुण्यातून समोर आलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण