पुणे, 14 ऑक्टोबर : पुण्याच्या सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 दिवसाच्या एका अर्भकाला वडिलांनी ठार मारून पुरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पोहचले असून पुढील तपास करीत आहेत.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगांव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या जंगलात एक अर्भक पुरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जन्मलेले बाळ हे अपंग असल्याने आई वडिलांनी त्या अर्भकाला जंगलात पुरले आहे. आरोपींनी मंदिरात जाऊन लग्न केले होते. तसेच ते वडगांव बुद्रुक येथील जाधवनगर परिसरात राहत असून मजुरी करून ते उदरनिर्वाह करत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! 3 वर्षे बायकोला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं; दरवाजा उघडताच फक्त हाडांचा सापळा
या दाम्पत्याला झालेले मुल गायब असल्याचे समजल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी आई वडिलांना सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, जन्मदात्यांनीच पोटच्या मुलाची हत्या करून त्याला पुरल्याने संताप व्यक्त केला जात आहे.