झुंझुनी, 21 फेब्रुवारी: देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचं सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच यामध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. येथील एका पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण (5 year old girl kidnapped) करुन तिच्यावर बलात्कार (rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर आरोपीने पीडित चिमुकलीची हत्या (Tried to murder) करण्याचा प्रयत्नही केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना राजस्थानातील झुंझुनी (jhunjhunu) परिसरातील श्योराणों की ढाणी या गावातील आहे. शुक्रवारी एक पाच वर्षांची मुलगी आपल्या दहा वर्षांच्या भावासोबत रस्त्याच्या कडेला खेळत होती. त्यावेळी एका युवकाने तिला स्कुटीवर बसवून सुसाट वेगाने निघून गेला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली. तर घटनेच्या तीन तासांनंतर शाहपूर रोडवरील एका विहिरीजवळ ही मुलगी रक्ताने माखलेली विव्हळताना आढळून आली.
त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या, गाडाखेडा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिक्षक शेर सिंह फोगाट यांनी पीडित चिमुकलीला त्वरित रुग्णालयात नेलं. पण तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला जयपूर येथे हलवण्यात आलं. त्यानंतर तपास करताना आरोपी पीडित मुलीला स्कुटीवर घेवून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो पीडितेला स्कुटीवर बसवून तिला घेवून जाताना स्पष्टपणे दिसला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
(वाचा -एका विहिरीजवळून हाकललं; दुसऱ्या विहिरीत मुला-मुलीसह वडिलांची उडी मारून आत्महत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित मुलीचं अपहरण करताना तिच्या भावाने रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण आरोपीने त्याला झटका देवून पळ काढला. त्यानंतर भावाने पाठीमागून दगडही मारले. पण तो बहिणीला नेण्यापासून रोखू शकला नाही. त्यानंतर आरोपी या पाच वर्षांच्या मुलीला फिरवायला घेवून जाण्याचा बहाणा करून निर्मनुष्य ठिकाणी घेवून गेला. त्यानंतर त्याने तिथे तिच्यावर बलात्कार केला. तसंच तिची हत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिला अर्धमेल्या अवस्थेत तिथेच टाकून आरोपीने पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सदर घटनेचा तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.