विजय देसाई, प्रतिनिधी
नालासोपारा, 11 मार्च : ज्या कुटुंबाने लहानपणापासून आधार दिला. त्याच घरात नोकराने एका अल्पवयीन मुलासोबत चोरी केली. धक्कादायक म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी त्याने फिनेल पिले. इतकेच नाही तर चक्क मालकीणीवरच चोरीचा आरोप घेतला. अशा भामट्या नोकराला तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक करून पावणेपाच लाखांचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांच्या या तपासाचे कौतुक केले जात आहे.
नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव खिंडीचा पाडा येथे सुनीती रीडर यांनी 28 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी राहते घरातील बेडरूमचे कपाटातील अंदाजे 4 लाख 77 हजार रुपये किमतीचे सोन्याचे, डायमंडचे दागदागिने व ओप्पो कंपनीचा ए 17 मोबाईल फोन चोरी झाल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सर्वप्रथम त्यांच्या घरचा नोकर उत्तम खंदारे याची चौकशी केली. पण त्याने ताकास तूर लागू दिला नाही. 'तो मी नव्हेच'चा नारा सुरु ठेवला. पोलिसांचा ससेमिरा सोडवण्यासाठी त्याने फिनेल पिवून आत्महत्येचा बनाव रचला. तो एव्हड्यावरच थांबला नाही. त्याने चक्क मालकीण आणि त्यांच्या पतीचे पटत नाही म्हणून तिने चोरी करायला लावली असेल असं सांगितले.
वाचा - व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्तीला बेदम मारहाण; जीव गेल्यावरच सोडलं, धक्कादायक VIDEO
उत्तम हा सुनितीच्या घरात लहानपणापासून राहिला आहे. त्यांनी त्याला एक 12 हजारांचा मोबाईल घेवून दिला होता. घरी कोणी नसताना अल्पवयीन आरोपी आणि उत्तम हे सीआयडी, क्राईमच्या मालिता बघत असे त्यातील शक्कल लढवून त्यांनी चोरी करायचे ठरवले. मालकिणीने त्याला इतके दिवस दिलेला आधार विसरून त्याची नियत बदलली त्याने घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलाला सोबत घेवून कपाटातील सर्व दागिने घेवून मोरेगावच्या डोंगरात एका दगडाखाली लपवून ठेवले होते. मात्र, मी चोरी केलीच नाही असेच सांगत होता. त्याने मालकिणीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तिनेच तिचे दागिने कोणालातरी दिले असतील असे पोलिसांना सांगत राहिला.
तुळींज पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या टीमने तांत्रिक बाबी तपासल्यानंतर एका अल्पवयीन मुलाच्या संपर्कात सतत असल्याचे आढळून आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आपलं कसब वापरून गुन्हा कबुल करून घेतला. चोरी केल्याचे कबूल केल्यानंतर चोरीचे दागिने 3 किलोमीटर दूर डोंगराच्या माथ्याशी नेवून दगडाखाली ठेवलेला 4,58,650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Mumbai police